![]()
पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी २५ ऑक्टोबरपासून इंडिगोची दररोज थेट विमानसेवा सुरू होणार आहे. हिवाळी वेळापत्रक २०२६-२७ अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामुळे पुणे आणि ओडिशाची राजधानी भुवनेश्वर यांच्यातील हवाई संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या नव्या सेवेमुळे व्यावसायिक, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य प्रवाशांना थेट प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मंजुरीनुसार २५ ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकासाठी पुणे विमानतळावरील दररोज उपलब्ध असलेल्या २३५ स्लॉटपैकी २१६ स्लॉट विमान कंपन्यांनी घेतले आहेत. यावरून पुण्यातून विमान प्रवासासाठी असलेली मागणी अधोरेखित होत आहे. पुणे विमानतळावरून सध्या देशातील ३५ शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. नव्या भुवनेश्वर सेवेमुळे या संपर्क व्यवस्थेत आणखी एका महत्त्वाच्या शहराची भर पडणार आहे. पुणे हे औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे, तर भुवनेश्वर हे प्रशासन, शिक्षण, उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नव्या सेवेचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. पुणे आणि भुवनेश्वरदरम्यान थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे अन्य शहरांमार्गे प्रवास करण्याची गरज कमी होऊ शकते. विशेषतः व्यावसायिक आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे-भुवनेश्वर थेट विमानसेवेमुळे व्यवसाय, पर्यटन आणि शिक्षणासाठी प्रवास अधिक सोयीचा होईल. तसेच पश्चिम आणि पूर्व भारतातील हवाई संपर्क वाढण्यास मदत होईल. पुणे विमानतळावरून अधिकाधिक शहरांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचाच हा भाग आहे.
Source link
पुणे-भुवनेश्वर दरम्यान 25 ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा सुरू:हिवाळी वेळापत्रकात पुणे विमानतळाचे जाळे विस्तारणार; 235 पैकी 216 स्लॉट आरक्षित