![]()
पुण्यात भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने झालेल्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. ही घटना मुंढवा परिसरात घडली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य अतुल वज्रमुष्ठी (वय ३१, रा. मोरया क्रिस्टल सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदाराने भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेले. यामुळे आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर चैतन्य आणि त्यांची पत्नी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले आणि ‘श्वानावरून आमच्या घरातील महिलांना मारहाण का केली?’ अशी विचारणा केली. आरोपींनी चैतन्य यांच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. दाम्पत्य जीव वाचवण्यासाठी पळू लागले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. चैतन्य यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिलाही मारहाण केली. पोलिस उपनिरीक्षक एन पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. पादचारी ज्येष्ठ महिलेला लुटले पादचारी ज्येष्ठ महिलेला लुटण्यात आल्याची घटना खराडी परिसरात घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या अंगावर पाणी उडवले. महिलेच्या पिशवीतून मोबाइल संच, मंगळसूत्र, सोन्याची अंगठी असा ऐवज लुटून नेण्यात आला. या प्रकरणी महिलेसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ महिला चंदननगर भागात राहायला आहेत. त्या खराडी बाह्यवळण मार्गावरील चौधरी वस्ती परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन चोरटा आणि एक महिला तेथे आले. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या अंगावर बाटलीतील पाणी टाकले. पाणी टाकल्यानंतर त्या गोंधळल्या. त्याचे लक्ष विचलित करुन महिलेने गळ्यातील दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यांच्या पिशवीतून सोन्याची अंगठी, मोबाइल संच काढून घेतला. ज्येष्ठ महिलेने आरडाओरडा केला. दुचाकीवरुन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश घुले तपास करत आहेत.
Source link
पुण्यात भटक्या श्वानाच्या मुद्द्यावरून राडा:मुंढव्यात दाम्पत्याला मारहाण, दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा