![]()
पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तळजाई वसाहतीतील टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडून १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत मुलाच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याच्या आरोपावरून ‘एल अँड टी’ कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक मनोहर मेहेटा यांच्यासह ठेकेदाराविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निखिल नितीन साठे (वय १४) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत निखीलची आई मंजू साठे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आठवीत शिकतो तो शाळेतून घरी आला. त्यानंतर काही वेळाने मित्र ओम कसबे याच्यासोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला. काहीवेळाने ओम निखिलच्या घरी आला. निखिल टाकीत पडल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. ही माहिती मिळताच निखीलची आई मंजू साठे, आजी, काका यांनी घटनास्थळी धाव घेतली. तळजाईतील बायोगॅस प्रकल्पाजवळ सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी निखिल जखमी अवस्थेत पडला होता. या भागातील रहिवासी उद्धव कांबळे यांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी निखिलला टाकीतून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या निखिल याला तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी संरक्षक जाळी, धोक्याची सूचना देणारा फलक, तसेच अन्य आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप निखिलची आई मंजू साठे यांनी फिर्यादीत केला आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी महापालिकेच्या शिवाजीनगर येथील पाणीपुरवठा विभागात जाऊन चौकशी केली. त्यावेळी संबंधित टाकीचे काम ‘एल अँड टी’ कंपनीला देण्यात आल्याची माहिती मिळाली. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडली, असे फिर्यादीत सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश मोरे तपास करत आहेत.
Source link
'एल अँड टी' कंपनीच्या व्यवस्थापकासह ठेकेदारावर गुन्हा:पाण्याच्या टाकीत पडून 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, दोन्ही पाय फ्रॅक्चर