Headlines

पुणे विमानतळावर बॉम्ब धमकीचा सराव:संशयास्पद बॅग आढळल्याने प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले; अनेक यंत्रणा सहभागी




पुणे विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) समन्वयाने शनिवारी वार्षिक प्रात्यक्षिक घेण्यात आले. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीतील तपासणी क्षेत्रात संशयास्पद बॅग आढळल्याचे काल्पनिक चित्र उभे करून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या सरावातून विविध सुरक्षा यंत्रणांची सज्जता आणि त्यांच्यातील समन्वय तपासण्यात आला. या प्रात्यक्षिकाची सुरुवात सकाळी ११ वाजता एएआयच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात झालेल्या बैठकीने झाली. त्यात संभाव्य धोका, संबंधित यंत्रणांच्या जबाबदाऱ्या आणि संदेशवहनाच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता टर्मिनल इमारतीत प्रत्यक्ष सराव घेण्यात आला. काल्पनिक परिस्थितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने इंडिगोच्या पुणे व्यवस्थापकाला तपासणी क्षेत्रात स्फोटक असल्याचा संशय असलेली बेवारस बॅग असल्याची माहिती दिली. व्यवस्थापकाने तातडीने सीआयएसएफच्या सुरक्षा नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर त्वरित प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) पाचारण करण्यात आले. संबंधित परिसरातील प्रवासी, कर्मचारी आणि व्यावसायिक आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. संशयित बॅगभोवतीचा परिसर बंदिस्त करून बॅगवर स्फोटाचा प्रभाव कमी करण्यासाठी विशेष संरक्षक आवरण (ब्लास्ट इनहिबिटर) ठेवण्यात आले. श्वानपथक, स्फोटक वाफ शोधक यंत्र आणि अन्य आधुनिक उपकरणांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यानंतर बॉम्बधमकी मूल्यांकन समितीने विशिष्ट स्वरूपाचा धोका असल्याचे घोषित केले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने बॅग सुरक्षित पात्रात ठेवून निर्धारित प्रक्रियेनुसार पुढील कारवाईचा सराव केला. विमानतळाच्या मालवाहतूक विभागात इंडिया पोस्टजवळ ठेवण्यात आलेले बनावट स्फोटकही राज्याच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने शोधले. या सरावात भारतीय वायुदल, पुणे पोलिस, आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, सीमाशुल्क, स्थलांतर विभाग, आरोग्य यंत्रणा आणि विविध विमान कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *