Headlines

'मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी एक दिवस दान करा':मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्च्यासाठी प्रकाश आंबेडकरांचे आवाहन




मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी 28 ऑक्टोबर रोजी लाखोच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हीटी स्टेशन) येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाचा हक्क आणि भावी पिढीचे भविष्य अबाधित राखण्यासाठी सुट्टी नसल्याचे कारण न देता, नागरिकांनी स्वतःच्या अधिकारांसाठी एका दिवसाचा त्याग करून या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी साद वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातला मोर्चा जाहीर झाल्यानंतर काही जणांचे फोन यायला लागले. दुर्दैवाने पाली असेल, कर्जत असेल, कसारा असेल, पालघर आहे… याच भागातले फोन आहेत. त्या फोनचा आशय असा आहे की, 28 तारीख सुट्टी नाही, आम्ही काय करायचं? दुर्दैवाने म्हणावं लागतंय की स्वतःचं स्वातंत्र्य दाखवण्याचं मतदान हे हक्काचं केंद्र आहे आणि अधिकार आहे. त्याच्याच वरती घाला घातला जातोय. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मतदानाचा अधिकार आहे म्हणून इज्जत आहे, मतदानाचा अधिकार आहे म्हणून आरक्षण दाखवलं जातंय, मतदानाचा अधिकार आहे म्हणून पोलिसांची कारवाई होते. मी या तमाम लोकांना आवाहन करतोय की उद्याच्या पिढीचे अधिकार वाचवायचे की नाही? वाचवायचे असेल तर एक दिवस त्या पिढीसाठी आपण दान दिलात तरी हरकत नाही आणि म्हणून लाखोच्या संख्येमध्ये 28 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी स्टेशन म्हणजे व्हीटी स्टेशन या ठिकाणी आपण सगळेजण जमावं ही अपेक्षा. हा मोर्चा जिजामाता उद्यान, भायखळा म्हणजे राणीबाग इकडून निघेल, 11 वाजता निघेल. ज्यांना राणीबाग येथे येणं शक्य आहे, त्यांनी राणीबाग येथे यावं… जिजामाता उद्यानात यावं. उरलेल्यांनी व्हीटी स्टेशनवरती डायरेक्ट पोहोचावं, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *