Headlines

मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?:कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला सवाल, म्हणाले- जनतेने आता पेटून उठावे




रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनंतर आता पर्यावरणप्रेमी आणि अभिनेत्यांनी या जंगलतोडीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून राज्यभरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीचे मुख्यमंत्र्यांना वाळवंट करायचे आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘सह्याद्री ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ सह्याद्रीच्या जंगलाचे महत्त्व सांगताना सयाजी शिंदे म्हणाले, “भारतातील एकूण जंगल जमिनीपैकी ५ टक्के जंगल आपल्या सह्याद्रीत आहे. याच डोंगरांमुळे आणि झाडांमुळे पाऊस पडतो, इथूनच उगम पावणाऱ्या नद्यांवर संपूर्ण महाराष्ट्र जगत आहे. मात्र, आता याच सह्याद्रीवर नवनवे प्रकल्प आणले जात आहेत. टोरेंटचा प्रकल्प हा त्यातीलच एक असून, त्यासाठी ६०० एकर जमीन देऊन तिथली झाडे राजरोसपणे तोडली जात आहेत.” ‘विकास नेमका कुणासाठी?’ या प्रकल्पातून मिळणाऱ्या फायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू इच्छितो की, ७१ कोटींची गुंतवणूक आणि ३० हजार कोटींचा फायदा तसेच यातून निर्माण होणारी वीज नेमकी कुणासाठी आहे? तिथल्या झाडांसाठी? की तिथल्या मोर, प्राणी आणि ५० प्रकारच्या माशांसाठी? या सर्वांचे नुकसान करून आणि पर्यावरणाचा बळी देऊन असले प्रकल्प कशाला हवेत? माझी पहिली बांधिलकी निसर्गाशी असून, मी आधी पशू-पक्षी आणि झाडांच्या बाजूने उभा राहीन, त्यानंतर माणसांचा विचार करेन,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. ‘सह्याद्रीचं वाळवंट करू नका’ जंगलांचे प्रमाण आधीच ५ टक्क्यांवर आले असताना अशा प्रकल्पांमुळे निसर्गाचा ऱ्हास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “असे २५ प्रकल्प आणून सरकारला सगळं काही संपवायचे आहे का? मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचे वाळवंट करायचे आहे का?” असा सवाल त्यांनी केला. ‘जनतेने पेटून उठावे, कायद्यात बदल करा’ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना थेट साद घालत कायद्यात बदल करण्याची मागणी केली. “तुम्हाला जे प्रकल्प करायचे आहेत ते करा, पण निसर्गाला फसवू नका. नियम बदला, कायद्यात बदल करा, पण झाडे तोडू नका. आपण निसर्गाला नाही, तर स्वतःलाच फसवतोय. तसेच, आपल्या डोळ्यादेखत सह्याद्रीचे वाळवंट होऊ नये यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने आता पेटून उठले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. सयाजी शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. —————– हेही वाचा.. टोरेंट कंपनी काय तुमची जावई आहे का?: भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून संदीप देशपांडे संतापले, म्हणाले – झाडं कापून कुठला ग्रीन प्रोजेक्ट होतो? कर्जत तालुक्यातील खांडस आणि भीमाशंकर अभयारण्यालगतच्या जंगलात ‘टोरेंट’ या गुजरातच्या कंपनीकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता स्वतः मैदानात उतरले असून, ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी या वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी कर्जत येथील पोलीस ग्राउंड मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून, या सभेत ते आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर अत्यंत सडकून टीका केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *