Headlines

500 कोटींचं प्रकरण आमच्या दृष्टीने संपलं:फॉरेन्सिक रिपोर्टनंतर सत्य बाहेर येईल- संजय शिरसाट, आदित्य ठाकरेंच्या कर्जत दौऱ्यावरुनही लगावला टोला




मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, ५०० कोटींची ऑडिओ क्लिप, कर्जतमधील वृक्षतोड आणि राजकीय नेत्यांची विधाने अशा विविध मुद्द्यांवर राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. विशेषतः मराठवाड्यात वाढलेल्या सावकारी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा ‘गुंड’ सावकारांचे परवाने रद्द करण्याची मागणी उद्याच्या कॅबिनेट बैठकीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सावकार नव्हे, हे तर गुंड आहेत’ मराठवाड्यात नोंदणीकृत सावकारांची संख्या वाढत असल्याबद्दल आणि त्यांच्या वसुलीच्या पद्धतीवर बोलताना शिरसाट म्हणाले, “ही जुन्या पद्धतीची सावकारी राहिलेली नाही. हे नवीन सावकार म्हणजे टोळ्या बाळगणारे गुंड आहेत. त्यांच्याकडे बाउन्सर आहेत आणि ते कर्जदाराला उचलून नेतात. २० टक्क्यांपेक्षा जास्त व्याजाने ते वसुली करतात. हा सावकारी व्यवसाय नसून एक प्रकारच्या गुंडगिरीला सरकार लायसन्स देत आहे, असा संभ्रम निर्माण झाला आहे.” यासोबतच मायक्रो फायनान्स कंपन्यांवरही कोणतेच निर्बंध नसल्याचे त्यांनी नमूद केले. “कुठूनतरी लायसन्स घेतात, टपरीसारखे ऑफिस टाकतात आणि ५-२५ बॉडीगार्ड ठेवून व्याजाचा धंदा सुरू करतात. हे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. उद्या कॅबिनेट बैठकीत मी या सर्वांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी स्वतः करणार आहे,” असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. ५०० कोटींच्या क्लिपवर: ‘फॉरेन्सिक रिपोर्टनंतर कारवाई निश्चित’ ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, “आमच्या दृष्टिकोनातून हा विषय आता संपला आहे. मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक चौकशीचे आदेश दिले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर हे षड्यंत्र कुणी रचले, क्लिप कुणी बनवली आणि यात कोण बोलत आहे, हे समोर येईल. त्यानंतर जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.” मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर नाराजी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिरसाट म्हणाले, एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने असे वक्तव्य केले असते तर आपण समजू शकतो. पण खर्गे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने पंतप्रधानांच्या वडिलांपर्यंत जाणे योग्य नाही. ही आपल्या देशाची संस्कृती नाही. खर्गे साहेबांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. ‘तटकरेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी’ रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील वादावर त्यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिला. “भरत गोगावले आणि शिवसेनेचे इतर नेते महायुतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून संयमाने घेत आहेत. पण तटकरे साहेबांनीही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. जर आता हा वाद वाढला, तर तो टोकाचा असेल,” असे शिरसाट म्हणाले. कर्जत वृक्षतोड आणि आदित्य ठाकरेंचा दौरा कर्जतमधील टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाला होत असलेल्या विरोधावर ते म्हणाले, “काही लोकांना विकास प्रकल्पांना विरोध करणे हा धंदा झाला आहे. हा प्रकल्प भीमाशंकर जंगलापासून १६ किलोमीटर दूर आहे आणि कुणाचे काही नुकसान होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.” आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कर्जत दौऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “आदित्य ठाकरे त्यांच्या फार्महाऊसवर जात असतील, जाता जाता ते तिकडे दौरा करतील. यापेक्षा जास्त त्यांना याच्याशी काही घेणे-देणे नाही.” —————— हेही वाचा.. शिंदे-फडणवीसांचा राजकीय ‘गेम’ करण्याचा कट: ऑडिओ क्लिपची ED चौकशी व्हावी, मराठा समाजासाठी लढल्यामुळे सरकारने खूप त्रास दिला- जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात या ऑडिओ क्लिपप्रकरणी मोठी खदखद आहे. फडणवीस यांना अंधारात ठेवून काही लोकांनी हे सर्व कारस्थान रचले होते. या षड्यंत्रातून शिंदे आणि फडणवीस दोघांचाही राजकीय गेम करायचा होता; मात्र ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे कट रचणाऱ्यांचाच गेम झाला आहे, असा दावा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *