![]()
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले आहेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे तर तब्बल 90 हजार झाडांची कत्तल होणार आहे. तसेच, भीमाशंकरप्रमाणेच राज्यात इतर 23 ठिकाणीही अशाच प्रकल्पांसाठी लाखो झाडे तोडली जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विजय कुंभार यांनी ‘ट्विटर’वर काही कागदपत्रे शेअर करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, भीमाशंकरमधील वृक्षतोडीच्या बदल्यात टोरंट कंपनीने कोयना धरण परिसरातील दोन गावांमध्ये वृक्षलागवड करण्याचे मान्य केले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप तिथे एकही झाड लावण्यात आलेले नाही. उलट, वृक्षलागवड करण्याऐवजी कंपनीने केवळ 3 कोटी 84 लाख रुपये देऊन या जबाबदारीतून हात वर केले आहेत. साईडोंगर हा एकमेव प्रकल्प नाही- विजय कुंभार विजय कुंभार यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्पांची यादी जाहीर करत म्हटले की, साईडोंगर हा एकमेव प्रकल्प नाही; महाराष्ट्रात असे तब्बल 23 पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहेत. मग प्रत्येक ठिकाणी जनतेने आंदोलन करायचे आणि सरकारने प्रकल्पांचे समर्थन करायचे का? असा सवाल कुंभार यांनी केला आहे. ‘..हाच सरकारचा विकास आहे का?’ तसेच पुढे विजय कुंभार यांनी म्हटले की, प्रत्येक भागाची भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थिती वेगळी आहे. पण सरकारला त्याचं काही देणंघेणं आहे की नाही? पर्यावरणाचा विचार न करता प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा आणि जनतेला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवायचं, हाच सरकारचा विकास आहे का? कंपन्यांच्या हितासाठी सरकारचा एवढा अट्टाहास, मग निसर्ग आणि जनतेच्या हितासाठी एवढीच तळमळ का नाही? असा संतप्त सवाल कुंभार यांनी केला आहे. प्रस्तावित टॉरंट पॉवर जलविद्युत प्रकल्प काय आहे? रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर-1 परिसरात उभारण्यात येणारा टॉरंट पॉवरचा ‘पंप-स्टोरेज हायड्रोइलेक्ट्रिक’ प्रकल्प हा वीजनिर्मिती आणि ऊर्जा साठवणुकीच्या उद्देशाने प्रस्तावित आहे. सुमारे 13,500 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता 3000 मेगावॅट इतकी असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची जागा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे.
Source link
भीमाशंकरमध्ये 34 हजार नव्हे, तर 90 हजार झाडांची कत्तल!:राज्यात असे आणखी 23 प्रकल्प प्रस्तावित; विजय कुंभारांनी थेट यादीच दाखवली