Headlines

शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं, तुझी लायकी किती:नवनाथ बन यांच्या आरोपांवरून नीलेश राणे कडाडले




विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेला कलह आता शिगेला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर आता शिवसेनेचे नेते नीलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे. नीलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट करत, ‘शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं,’ असा थेट इशारा बन यांना दिला आहे. तसेच, पत्रकारांशी बोलताना त्यांनी या आरोपांमागे कुणीतरी ‘बोलविता धनी’ असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. नीलेश राणे यांनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नवनाथ बन यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “नवनाथ बन, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती अन् तू बोलतो किती.” या पोस्टमुळे महायुतीमधील तणाव आता चव्हाट्यावर आला आहे. ‘नवनाथ बन म्हणजे भाजप नव्हे’ नवनाथ बन यांच्या आरोपांना उत्तर देताना राणे म्हणाले, “नवनाथ बन म्हणजे संपूर्ण भाजप नाही, ते केवळ पक्षाचे एक प्रवक्ते आहेत. कोणतेही सबळ पुरावे नसताना त्यांनी शिवसेनेवर असे बिनबुडाचे आरोप करू नयेत.” ‘नवनाथ बन यांचा बोलविता धनी कोण?’ या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देताना राणे यांनी मोठा संशय व्यक्त केला. “नवनाथ बन यांच्यात स्वतःहून एवढे मोठे बोलण्याची ताकद आहे का? त्यांच्या मागून कोणीतरी त्यांना हे सर्व बोलायला लावत आहे का, असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतो,” असे म्हणत राणे यांनी या विधानांमागे भाजपमधीलच दुसऱ्या कुणाचा तरी हात असल्याची शक्यता वर्तवली. ‘पराभवाचे खापर मित्रपक्षावर फोडू नका’ महायुतीचे महत्त्व अधोरेखित करताना राणे म्हणाले, “महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीतील पराभवाचे खापर एका मित्रपक्षावर फोडणे योग्य नाही. आपल्याला युती टिकवायची आहे, हे विसरून चालणार नाही. असे भांडण लावून किंवा एकमेकांवर आरोप करून युती टिकणार नाही.” ‘कुटुंबात मिठाचा खडा टाकू नका’ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल शिवसेनेला आदर असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. “आम्ही भाजपचा आणि त्यांच्या नेत्यांचा आदर करतो. भाजप हा आमचा मित्रपक्ष आणि सहयोगी पक्ष आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो. भाजपचे वरिष्ठ नेते स्वतःहून अशी विधाने करतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे एक-दोन लोकांनी यात मिठाचा खडा टाकून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये,” असे आवाहन राणे यांनी केले आहे.
—————– हेही वाचा.. राज्याचे नेतृत्व बदलून एकनाथ शिंदेंकडे द्या: शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांची मागणी; म्हणाले- भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येऊ शकतात

विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या कामगिरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या निकालाला राज्याच्या नेतृत्वाचा पराभव असल्याचे सांगत, राज्याचे नेतृत्व बदलून ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पाहिजे, या आपल्या मागणीचा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुनरुच्चार केला आहे. यासोबतच, शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप करणारे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही त्यांनी ‘ते पगारी माणूस आहेत, त्यांचे काय ऐकता?’ अशी टीका केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *