“नैसर्गिक संकट किंवा आपत्तीच्या काळात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर केरळचा पूर असो वा जम्मू-काश्मीरमधील अतिवृष्टी, नेहमीच सर्वात प्रथम धावून जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे. पक्ष आणि आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्ण ताकदीने बळीराजाच्य
.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आनंद परांजपे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी पक्षाने सुरू केलेली मदत मोहीम, विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीमधील ताणतणाव आणि भाजप प्रवक्त्यांकडून मित्रपक्षावर होणाऱ्या भाषेच्या वापरावर संयमी परंतु सडेतोड शब्दांत पक्षाची भूमिका मांडली.
गायकवाडांचे वक्तव्य निषेधार्ह, मुख्य नेत्यांकडून कारवाईचे संकेत
आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आनंद परांजपे म्हणाले, “शेतकरी हा देशाचा आणि राज्याचा अन्नदाता आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा पूर्णपणे बळीराजाला समर्पित करण्यात आला होता. अशा वेळी कोणत्याही लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य करू नये, असे एकनाथ शिंदे यांचे कडक आदेश आहेत. गायकवाड यांच्या विधानाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो आणि त्यांच्यावरील कारवाईचे संकेत पक्षप्रमुखांनी आधीच दिले आहेत. भविष्यात पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने अथवा लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची शेतकरीविरोधी वक्तव्ये करू नयेत, असे स्पष्ट आणि कडक निर्देश शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आले आहेत.”
शिवसेना नेहमीच बांधावर धावून जाणारा पक्ष
शिवसेनेने संकटकाळात केलेल्या मदतीचा ताळेबंद मांडताना त्यांनी माहिती दिली. “राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील भगिनींना स्वावलंबी करण्यासाठी तब्बल 25,000 शिलाई मशिन्सचे वाटप करण्यात येत आहे, तर शेतकऱ्यांच्या मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून 25,000 सायकलींचे वाटप सुरू आहे. ज्या शेतकरी कुटुंबांतील मुलींची लग्ने ठरली आहेत, त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने भव्य सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जाणार आहेत.”

180 तालुक्यांत 4 लाख शिधा किट्स
“राज्यातील दुष्काळग्रस्त 180 तालुक्यांमध्ये आतापर्यंत तब्बल 4,00,000 दिवाळी शिधा किट्स पोहोचवण्यात आले आहेत. संकट कोणतेही असो, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभी राहते.”
आमच्याकडेही शब्दांचा मोठा कोश, पण ‘दोस्तीत कुस्ती’ करायची नसते
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकरांना ‘माकडछाप’ आणि ‘झारीतील शुक्राचार्य’ म्हटल्याच्या मुद्द्यावर परांजपे यांनी भाजपला इशारा दिला. ते म्हणाले, “पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्त्यांनी ज्या शब्दांचा वापर केला, तो महायुतीच्या संस्कृतीला आणि समन्वयाला अजिबात साजेसा नाही. मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे आणि आमच्याकडेही मराठी भाषेचा खूप मोठा शब्दकोश आहे. आम्हीही त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ शकतो; परंतु युतीत राहून ‘दोस्तीत कुस्ती’ करायची नसते, याचे भान ठेवले पाहिजे.”
मित्रपक्षांवर टीकेला बंदी
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व प्रवक्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, मित्रपक्षांवर जाहीरपणे कोणतीही टीका करू नये. हीच सभ्यता आणि आचारसंहिता भाजपनेही पाळावी, ही आमची माफक अपेक्षा आहे.”
2 जागांवर अंतर्गत मतभेदांमुळे नुकसान; तिन्ही प्रमुख नेते समन्वयावर चर्चा करतील
विधानपरिषदेच्या 5 जागांच्या निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेल्या वादावर परांजपे म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे २ जागांवर महायुतीला फटका बसला हे वास्तव आहे. मात्र, माध्यमांमध्ये जाहीर आरोप-प्रत्यारोप करून परिस्थिती सुधारणार नाही.”
वरिष्ठ पातळीवर तोडगा निघेल
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून महायुतीच्या समन्वयावर नक्कीच चर्चा करतील. तिन्ही पक्षांनी एकमेकांवर दोषारोप करणे टाळून एकदिलाने काम करण्याची गरज आहे,” असा पुनरुच्चार आनंद परांजपे यांनी शेवटी केला.
———————————————————
हेही वाचा…
शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं, तुझी लायकी किती: नवनाथ बन यांच्या आरोपांवरून नीलेश राणे कडाडले

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेला कलह आता शिगेला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर आता शिवसेनेचे नेते नीलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे. नीलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट करत, ‘शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं,’ असा थेट इशारा बन यांना दिला आहे. तसेच, पत्रकारांशी बोलताना त्यांनी या आरोपांमागे कुणीतरी ‘बोलविता धनी’ असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी