Headlines

सिंबायोसिसच्या एपीक्यूएन शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन:प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन




शिक्षणामुळे व्यक्तीचे जीवन बदलते, तर दर्जेदार शिक्षण देशाचे भविष्य घडवते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असली, तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. प्रत्येक पदवीची विश्वासार्हता टिकविण्यासोबतच विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लवळे येथे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयोजित आशिया-पॅसिफिक गुणवत्ता नेटवर्कच्या (एपीक्यूएन) शैक्षणिक परिषद २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष प्रा. नागेश्वर राव, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार, एपीक्यूएनच्या अध्यक्षा डॉ. गॅलिना मोटोव्हा, सिंबायोसिसच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर आणि कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन उपस्थित होते. शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर आवश्यक दर्जेदार शिक्षणाच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आणि त्याचे भविष्य असले पाहिजे. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता दिली पाहिजे. शिक्षकांना सातत्याने नवे ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असून, शैक्षणिक मूल्ये आणि प्रामाणिकपणा जपत या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यामुळेही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील, असे पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची कामगिरी हाच गुणवत्तेचा निकष मोठे परिसर आणि अत्याधुनिक सुविधा म्हणजे दर्जेदार शिक्षण नव्हे. विद्यार्थ्यांची कामगिरी, रोजगारक्षमता आणि त्यांनी आत्मसात केलेली कौशल्ये यांवरून शैक्षणिक संस्थांचा दर्जा ठरविला पाहिजे, असे मत प्रा. नागेश्वर राव यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणात प्रवेश आणि बाहेर पडण्याची लवचिकता तसेच शैक्षणिक श्रेयांक हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रमांसह उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा संस्थांनी अधिक प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सातत्यपूर्ण सुधारणांच्या माध्यमातूनच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *