![]()
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “देश सोडून पळून गेलेला उद्योजक विजय मल्ल्या हा दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकील नाही. त्यांचे उद्योग साम्राज्य कुणालातरी घशात घालायचे होते, म्हणूनच त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले,” असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. एवढेच नाही तर, “सध्या या देशाचा स्वाभिमान असलेले ‘टाटा’ यांचे उद्योगही गिळण्याचा प्रकार सुरू असून, एक दिवस टाटांनाही देश सोडून जावे लागेल,” अशी धक्कादायक भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या आगामी पुस्तकातील काही प्रकरणांचा (केस स्टडीज) दाखला देत हा हल्लाबोल केला आहे. ‘विजय मल्ल्या दाऊद इब्राहिम नाही’ आपल्या पुस्तकात विजय मल्ल्या यांच्या प्रकरणावर एक ‘केस स्टडी’ असल्याचे सांगताना राऊत म्हणाले, “कोणाचीही इच्छा नसते की आपले घर, परिवार सोडून देश सोडून जावे. ज्या पद्धतीने मल्ल्यांना देश सोडून जावे लागले, ते मी आर्थिक क्षेत्रातील एक केस स्टडी म्हणून पाहतो. गेल्या १०-१२ वर्षांत एका उद्योगाला कसे उद्ध्वस्त करायचे आणि तो ताब्यात कसा मिळवायचा, याचे खूप मोठे कारस्थान झाले आहे. विजय मल्ल्यांचे साम्राज्यही कुणालातरी घशात घालायचे होते. देशातून पळून जाणारे हे लोक दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकील नाहीत. या लोकांनी देशात मोठे उद्योग उभारले आणि सरकारला लाखो कोटींचा कर भरला आहे.” ‘टाटांनाही एक दिवस देश सोडावा लागेल’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका विधानाचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “राहुल गांधी जे आज बोलत आहेत, ते मी दोन महिन्यांपूर्वीच बोललो होतो की, आता ‘टाटा’ गिळण्याचा प्रकार सुरू आहे. या देशाचा प्राईड आणि स्वाभिमान असलेले टाटा हे मोदी आणि शहा कोणाच्यातरी घशात घालत आहेत. मुंबई विमानतळाचे काय झाले ते आपण पाहिलेच आहे. जे विजय मल्ल्यांच्या बाबतीत झाले, तेच आता सुरू आहे. कदाचित एक दिवस टाटांना सुद्धा देश सोडावा लागेल.” ‘बँकेचे दरवाजे बंद केले जातात’ उद्योगपती आणि बँकांच्या कर्जावर बोलताना राऊत यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. “अनेक बँका राज्यकर्त्यांच्या जवळच्या उद्योगपतींनी बुडवल्या. हजारो कोटींची कर्जे माफ केली गेली. पण जेव्हा मल्ल्यांसारखा एखादा उद्योजक बँकेशी चर्चा करून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे दरवाजे बंद केले जातात,” अशी थेट टीका त्यांनी केली. ‘अमृत’ व्हिस्कीचा रंजक संदर्भ पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राऊत यांनी पुस्तकातील एका रंजक गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “भारत अनेक बाबतीत पुढे जात आहे, अगदी दारूच्या बाबतीतही. भारतात निर्माण होणारी ‘अमृत’ नावाची व्हिस्की जगात तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट व्हिस्की आहे आणि विशेष म्हणजे तिचे निर्माते एक मराठी गृहस्थ आहेत.” —————– हेही वाचा.. शेतकऱ्यांना 5 हजार, कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी: रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, निधीचा हिशोब मागितला
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “एकीकडे दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये टेकवून सरकार त्यांची थट्टा करत आहे, तर दुसरीकडे नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा हिशोब द्यायला सरकार तयार नाही,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या कामातील माहिती अधिकारात (RTI) दडवली जात असल्याचा आरोप करत पवारांनी आज थेट वृत्तपत्रात ‘जाहीर नोटीस’ प्रसिद्ध करून सरकारविरोधात कायदेशीर लढाईचे रणशिंग फुंकले आहे. सविस्तर वाचा
Source link
विजय मल्ल्या दाऊद इब्राहिम नाही, टाटांनाही देश सोडण्याची वेळ येईल:संजय राऊतांचा केंद्र सरकारवर खळबळजनक आरोप