![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशीच त्यांच्या पदोन्नती आणि बदलीचा शासन आदेश जारी केला. त्यांची अपर जिल्हाधिकारी (गट-अ) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती करण्यात आली असून, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर असताना हा निर्णय झाल्याने सहकार आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने सध्याच्या पदावरच काम करावे लागणार सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार मोसमी बर्डे चौगुले यांच्या पदोन्नती आणि बदलीचा आदेश काढण्यात आला आहे. मात्र, त्या सध्या निवडणुकीच्या अधिसूचित पदावर कार्यरत असल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरचा कार्यभार सोडता येणार नाही. भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू असलेली विशेष सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना सध्याच्याच पदावर काम करावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदार पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पदाचा कार्यभार स्वीकारता येईल, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बदलीचा आदेश जारी झाला असला तरी प्रत्यक्ष पदभार बदलण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय संघर्ष दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सत्ताधारी महायुती आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यात संघर्ष सुरू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत समविचारी आघाडीने 13 जागा मिळवत आघाडी घेतली, तर महायुतीच्या वाट्याला 12 जागा आल्या. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला आवश्यक संचालकांची उपस्थिती न मिळाल्याने निवडीची प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 14 संचालकांचा कोरम आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महायुतीचे 12 संचालक सभेला अनुपस्थित राहिल्याने पहिल्याच बैठकीत अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला. समविचारी आघाडीची उच्च न्यायालयात धाव पहिल्या सभेत अध्यक्ष निवड होऊ न शकल्याने समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अध्यक्ष निवडीसाठी 14 संचालकांच्या उपस्थितीचा कोरम बंधनकारक नसल्याचा दावा करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर पहिल्या सभेला अनुपस्थित राहिलेल्या महायुतीच्या 12 संचालकांना नोटीस बजावण्यात आली. तसेच राज्य सरकारसह संबंधित सर्व 12 संचालकांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले. न्यायालयाने महायुतीच्या संचालकांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस काढल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय आता न्यायालयीन प्रक्रियेतही पोहोचला आहे. आबिटकर आणि मुश्रीफ यांची भूमिका स्पष्ट न्यायालयीन घडामोडींनंतर महायुतीच्या नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या पुढील बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी बैठकीत अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलीच्या निर्णयामुळे चर्चांना उधाण एकीकडे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून न्यायालयीन लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांची पदोन्नतीसह बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 31 ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशी हा आदेश जारी झाल्याने या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गोकुळच्या निवडणुकीतील सत्तासमीकरण, अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेला वाद आणि न्यायालयीन हस्तक्षेप या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बदलीकडेही लक्ष वेधले जात आहे. मात्र, शासन आदेशानुसार मतदार पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चौगुले यांना कोल्हापुरातच कार्यरत राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीचा प्रत्यक्ष परिणाम गोकुळच्या आगामी निवडणूक प्रक्रियेवर कसा होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. जळगावमध्ये भरदिवसा स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा:30 कोटींचे सोने अन् 12 लाखांची रोकड लंपास, गावकऱ्यांनी पाठलाग करून आरोपींना पकडले जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात भरदिवसा स्टेट बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बँकेत घुसून कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर बँकेतील तब्बल 30 कोटी रुपयांचे सोने आणि 12 लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र, दरोड्याची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपींचा पाठलाग केला. या कारवाईत तीन आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. सविस्तर वाचा….
Source link
गोकुळच्या सत्तासंघर्षादरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली:पदोन्नती देत थेट छत्रपती संभाजीनगरला पाठवले