![]()
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात भिवंडीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नारपोली पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) संयुक्त पथकाने काल्हेर येथील अरिहंत कंपाउंड परिसरात छापा टाकून तब्बल 57 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 42 लाख 96 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 15 लाख रुपये किमतीच्या टाटा टेम्पोचा समावेश आहे. या प्रकरणी लियाकत साबीर अली (वय 39) याला पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने गेल्या तीन महिन्यांत विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडीत करण्यात आलेल्या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतुकीचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त पथकाचा छापा भिवंडीतील काल्हेर येथील अरिहंत कंपाउंड परिसरातून टाटा टेम्पोच्या माध्यमातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही विभागांच्या पथकाने संयुक्तपणे संबंधित परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान टाटा टेम्पोमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये कमला पसंद आणि राजश्री पान मसाल्याची पाकिटे असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेल्या या पदार्थांचा साठा पोलिसांनी तातडीने जप्त केला. 42.96 लाखांचा गुटखा, 15 लाखांचा टेम्पो जप्त या कारवाईत पोलिसांनी 42 लाख 96 हजार रुपये किमतीचा कमला पसंद आणि राजश्री पान मसाल्याचा साठा जप्त केला. तसेच प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा 15 लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पोही ताब्यात घेतला. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 57 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लियाकत साबीर अली (वय 39) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संयुक्त कारवाया केल्या जात आहेत. भिवंडीतील या कारवाईनंतर या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा… गोकुळच्या सत्तासंघर्षादरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली:पदोन्नती देत थेट छत्रपती संभाजीनगरला पाठवले कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशीच त्यांच्या पदोन्नती आणि बदलीचा शासन आदेश जारी केला. त्यांची अपर जिल्हाधिकारी (गट-अ) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती करण्यात आली असून, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर असताना हा निर्णय झाल्याने सहकार आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा….
Source link
भिवंडीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याची अवैध वाहतूक उघड:58 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक