![]()
हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथे शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून शेतीतील आखाड्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी तारीख 8 पहाटे उघडकीस आली आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथे कमळाजी लगड (55) यांना सावरखेडा शिवारामध्ये सुमारे 6 एकर शेत आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन कापूस व हळदीचे पीक घेतले आहे. या शेतावर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्ज घेतले आहे. या शेतातील उत्पन्नावरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचा अपघात झाला या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारासाठी सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा खर्च झाला. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन हातचे गेले तसेच कापसाची पीकही हाती आली नाही आता पाणी नसल्यामुळे हळद वाळून जात आहे. या परिस्थितीत मुलाच्या उपचाराचा खर्च कसा करावा तसेच पीक कर्ज कसे भरावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ झाले. दरम्यान शनिवारी रात्री लगड कुटुंबीय भोजन करून झोपले होते. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास कमळाजी यांचा मृतदेह घरालगत असलेल्या आखाड्यामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार शंकर गायकवाड, राजू गुठ्ठे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, अशोकराव हरण यांनीही घटनास्थळी भेट देऊन लगड कुटुंबीयांचे संपन्न केले. दरम्यान पोलिसांनी मयत कमळाजी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. या ठिकाणी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मयत कमलाजी यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
Source link
नापिकी-कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या:घरालगतच्या आखाड्यावर आढळला मृतदेह, हिंगोली तालुक्यातील दुर्दैवी घटना