![]()
दिवाळीचा सण संपूर्ण देशभरात उत्साहात आणि प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदाची दिवाळीची रात्र मुंबईसाठी अत्यंत आव्हानात्मक आणि धोक्याची ठरली. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या रात्री मुंबईत एकाच रात्रीत तब्बल १४२ ठिकाणी आगी लागल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यापैकी तब्बल १३७ दुर्घटना या थेट फटाक्यांमुळे घडल्याची अधिकृत माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे यापैकी कोणत्याही घटनेत जीवितहानी किंवा कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. रात्री ९ नंतर घटनांमध्ये मोठी वाढ दिवाळीच्या रात्री मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. मात्र, रात्री ९ वाजल्यानंतर आगीच्या घटनांमध्ये अचानक मोठी वाढ झाली. अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला एकामागून एक मदतीचे कॉल्स येऊ लागले. डोंगरी, कुर्ला, मिलिटरी रोड, मालाड आणि घाटकोपर या परिसरांमध्ये आगीच्या सर्वात भीषण घटनांची नोंद झाली. डोंगरीत सर्वात मोठी आग मुंबईत लागलेल्या आगींपैकी सर्वात मोठी आणि भीषण आग डोंगरी परिसरात लागली. या आगीला ‘लेव्हल-२’ची आग म्हणून घोषित करण्यात आले होते. आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल ९ फायर इंजिन आणि ११ जम्बो टँकर घटनास्थळी दाखल करावे लागले. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी हानी टाळली. ९६ टक्के घटना फटाक्यांमुळेच अग्निशमन दलाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री लागलेल्या १४२ पैकी तब्बल १३७ घटना (जवळपास ९६ टक्के) या केवळ फटाक्यांमुळेच घडल्या आहेत. फटाक्यांची ठिणगी उडणे, रॉकेट चुकीच्या ठिकाणी जाणे किंवा मोकळ्या जागेत लावलेल्या फटाक्यांमुळे या आगी लागल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाची तत्परता ठरली निर्णायक एकाच रात्रीत इतक्या मोठ्या संख्येने आगी लागूनही, सुदैवाने संपूर्ण मुंबईत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. यामागे मुंबई अग्निशमन दलाची तत्परता आणि वेळेवर केलेले बचावकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. जवानांनी प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगींचे हे प्रमाण पाहता, प्रशासनाकडून नागरिकांना यापुढे फटाके फोडताना अधिक काळजी घेण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये अग्नितांडव: घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू धाराशिव जिल्ह्यात येडशी येथे मध्यरात्री एका घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांचा गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील गोविंद करंडे यांच्या घराला ही भीषण आग लागली. करंडे कुटुंबाचे खाली किराणा दुकान होते आणि ते वरच्या मजल्यावर वास्तव्याला होते. रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस संपल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. पाहता पाहता आगीने इतके रौद्र रूप धारण केले की, गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीच्या ज्वाळा आणि प्रचंड धुरामुळे गुदमरून घरातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गोविंद करंडे, त्यांची पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि करंडे यांचे आई-वडील यांचा समावेश आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेतून सुदैवाने केवळ एकजण बचावला असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सविस्तर वाचा ——————- हेही वाचा.. दिवाळीत देशभरात फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना: जम्मूमध्ये 12 दुकाने जळाली, नागपूरमध्ये बाइक शोरूमला आग, पुण्यात 63 घटना
दिवाळीदरम्यान देशातील अनेक शहरांमध्ये फटाक्यांमुळे आग लागण्याच्या आणि दुर्घटनांच्या घटना समोर आल्या. या दुर्घटनांमध्ये एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले असून काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. राजस्थानच्या पाली येथे फटाक्यांच्या दुकानाला आग लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण बेपत्ता आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी तीन दुकाने आणि अनेक दुचाकी वाहनेही जळून खाक झाली. दरम्यान, दिल्लीतील नरेला येथे रॉकेट फटाका पोटाला लागल्याने १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा
Source link