![]()
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपुरात २४ तासांत आगीच्या ४२ घटनांचे कॉल अग्निशमन दलाला आले. यातील बहुतांश आगी फटाक्यांमुळे लागल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले. रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदी असूनही नागरिकांनी रस्त्यांवर आणि दुभाजकांमध्ये फटाके फोडले. सावरकरनगरमधील टीव्हीएस दुचाकी शोरूमच्या छतावर रॉकेट पडल्याने आग लागली. यात शोरूमचा वरचा मजला आणि अनेक दुचाकी जळाल्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मेडिकल चौकातील त्रिभुवन हार्डवेअर दुकानालाही फटाक्यांमुळे आग लागली. दुकानाच्या छतावर टिनाचे शेड उभारून पेंटचे डबे ठेवले होते. जिन्यातून जाण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. मात्र, दुकानात दोन जिने असल्याने आग आटोक्यात आणता आली, असे राजेंद्र उचके यांनी सांगितले. महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाला ८ नोव्हेंबर सकाळी ८ ते ९ नोव्हेंबर सकाळी ८ या वेळेत आगींचे ४२ कॉल आले. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ५, रात्री ८ ते मध्यरात्री १२ दरम्यान २४ आणि मध्यरात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत १३ कॉल आले. निम्म्याहून अधिक कॉल रात्री ८ ते १२ या चार तासांत आले. दिवाळीतील आगींच्या घटनांची मागील तीन वर्षांची आकडेवारी अशी आहे: २०२३ मध्ये ३७ पैकी २०, २०२४ मध्ये ५४ पैकी २८ आणि २०२५ मध्ये १६ पैकी ७ आगी फटाक्यांमुळे लागल्या होत्या. २०२५ मध्ये घटनांची संख्या कमी झाली होती. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४२ कॉल आले.
Source link
नागपुरात २४ तासांत आगीच्या ४२ घटना:रस्त्यांवरील बंदी झुगारून फटाके फोडले; रॉकेटमुळे दुचाकी शोरूम जळाले, मेडिकल चौकातील हार्डवेअर दुकानाचेही नुकसान