![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद शाळा. एकेकाळी या शाळेची अवस्था फारशी चांगली नव्हती. शाळेत विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या भौतिक सुविधा नव्हत्या. विद्यार्थ्यांची संख्याही अवघी 95 होती. मात्र, आज याच शाळेत 275 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ गावातीलच नव्हे, तर परिसरातील इतर गावांमधील विद्यार्थीही या शाळेकडे वळत आहेत. या बदलामागे आहेत प्रयोगशील शिक्षक पांडुरंग जाधव. स्वतःच्या आयुष्यात शिक्षणासाठी संघर्ष केलेल्या या शिक्षकाने शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास घेतला. झाडे लावण्यापासून ते संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय उभारण्यापर्यंत अनेक उपक्रम राबवले. सुरुवातीला विरोध झाला, अडचणी आल्या. मात्र, त्यांनी हार मानली नाही. आज झाडांना सुरुवातीला विरोध करणारे गावकरी त्याच झाडांच्या सावलीत बसून त्यांना आशीर्वाद देतात. एका शिक्षकाच्या जिद्दीने शाळा आणि गावात निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याची ही गोष्टय. वडिलांनी शिक्षणासाठी दोन एकर शेती विकली… पांडुरंग जाधव यांचा आजचा प्रवास समजून घ्यायचा असेल, तर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचं बालपण शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबात गेलं. घरची परिस्थिती बेताची. शेती हाच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार. अशा परिस्थितीत मुलांचं शिक्षण पूर्ण करणं हे त्यांच्या वडिलांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, असा त्यांचा ठाम निर्धार होता. आपल्या दोन्ही मुलांना शिकवायचं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, या ध्येयासाठी आईने कंबर कसली. वडिलांनीही मोठा त्याग करायच ठरवलं. पांडुरंग यांच्या भावला इंजिनिअर व्हायचं होतं. त्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळं आई शिकलेली नसताना सुद्धा शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन तिने वडिलांना शेती विकण्यास तयार केले. एका शेतकऱ्यासाठी त्याची शेतीच सगळं काही असते. मात्र, तिलाच विकून टाकायची वेळ येणं म्हणजे पोटचा गोळा कापून टाकण्यासारखं आहे. पण या निर्णयामुळे पांडुरंग यांच्या भावाचे आणि त्यांचे आयुष्य बदलले. पांडुरंग शिक्षक झाले आणि त्यांचे भाऊ इंजिनिअर झाले. वडिलांनी केलेल्या या त्यागाची जाणीव दोन्ही भावांना होती. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, मेहनत घेतली आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले. पुढे दोघेही कमवू लागल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम कोणती गोष्ट केली असेल, तर ती म्हणजे वडिलांनी विकलेली शेती पुन्हा विकत घेऊन त्यांना परत देणं. वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी जमिनीचा त्याग केला होता; मुलांनी मात्र त्या त्यागाचं मोल जाणत तीच जमीन पुन्हा वडिलांच्या स्वाधीन केली. हा प्रसंग जाधव कुटुंबातील नात्यांची घट्ट वीण दाखवणारा आहे. एका बाजूला मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभराच्या कष्टांची जमीन विकणारे वडील, तर दुसऱ्या बाजूला मोठे झाल्यानंतर वडिलांच्या त्यागाची परतफेड करण्याचा प्रयत्न करणारी मुलं. या घटनेतून पांडुरंग जाधव यांच्या आयुष्याला मिळालेल्या संस्कारांची कल्पना येते. शिक्षणामुळे माणसाचं आयुष्य बदलू शकतं, हे त्यांनी स्वतः अनुभवलं होतं. त्यामुळेच पुढे शिक्षक म्हणून काम करताना शिक्षणाची संधी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचली पाहिजे, ही भावना त्यांच्या कामामागे कायम राहिली. शिक्षक म्हणून नवा प्रवास आणि शाळेच्या बदलाचा ध्यास… शिक्षण पूर्ण केल्यानंतर पांडुरंग जाधव यांचा शिक्षक म्हणून प्रवास सुरू झाला. शिक्षकाची नोकरी म्हणजे केवळ वर्गात जाऊन अभ्यासक्रम शिकवणं, एवढ्यापुरतीच त्यांची भूमिका मर्यादित नव्हती. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर त्यांना मिळणारं शैक्षणिक वातावरणही तितकंच महत्त्वाचं असतं, याची त्यांना जाणीव होती. याच विचारातून त्यांची नियुक्ती झालेल्या शाळेकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. 21 जुलै 2014 रोजी जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा जळगाव मेटे येथे ते रुजू झाले. तेव्हा शाळेची परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. विद्यार्थ्यांना आकर्षित करतील अशा सुविधा नव्हत्या. शाळेत शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या अनेक भौतिक गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची ओढ निर्माण करणं हे मोठं आव्हान होतं. शाळेची परिस्थिती बदलायची असेल, तर केवळ वर्गातील अध्यापनात बदल करून चालणार नाही. त्यासाठी शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि गावाचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलायला हवा, हे पांडुरंग सरांनी ओळखलं. त्यांनी सर्वप्रथम शाळेच्या परिसराकडे लक्ष दिलं. परिसरात झाडं लावली, ती वाढवली आणि शाळेचा परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, हा उपक्रम केवळ शाळेपुरता मर्यादित ठेवण्याऐवजी त्यामागे त्यांनी व्यापक विचार केला होता. शाळेतील बोअरला पाणी होते. ते पाणी गाव देखील वापरायचे. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करून झाडांची वाढ करता येईल, गावाला हिरवाईने समृद्ध करता येईल आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचाही परिसर सुंदर करता येईल, असा विचार त्यांच्या मनात आला. पांडुरंग जाधव सर सांगतात, ‘मी जेव्हा इथे बदली होऊन आलो तेव्हा शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम झाले होते. शाळेतच बोअर असल्यामुळे तिला एवढं पाणी होतं की ते गावकरी देखील वापरायचे. म्हणून मग मी ठरवलं की पहिली सुरुवात आपण झाडे लावण्यापासूनच करुयात. सुरुवातीला अनेकजण म्हणायला लागले की काय तू पांडुरंग कशाला या सगळ्या गोष्टी करतोस. या खडकावर ही झाडं येणार नाहीत, उन्हाळ्यात त्याला पाणी नाही भेटलं तर ती जळून जातील. पण मी मागे हटलो नाही. मुलांना पुढे घेऊन मी झाड लावली, त्याच महत्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आज तीच लोक येऊन झाडाच्या सावलीत बसतात. पाऊस कमी झाला की पाण्याची अडचण होते. मात्र, गावकऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळं इथे ठिबक सिंचनाची प्रक्रिया आम्ही राबवली आणि झाड जगवली. गाव आणि गावातले लोक खरोखरचं खूप सपोर्ट करणारे आहेत.’ नव्या गोष्टींकडे सुरुवातीला संशयाने पाहणारी काही माणसं होती. हा उपक्रम किती दिवस चालेल, त्याचा उपयोग काय होईल, असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, जाधव यांनी विरोधाला उत्तर देण्यासाठी वाद घातला नाही. त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. झाडं लावली, त्यांची काळजी घेतली आणि ती मोठी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मते, एखाद्या चांगल्या कामाची परिणामकारकता शब्दांपेक्षा कृतीतून अधिक स्पष्ट होते. या बदलामध्ये केवळ झाडांची वाढ नाही, तर एका शिक्षकानं गावकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. कारण झाड लावणं ही एक कृती असली, तरी त्याला वाढवणं ही सातत्याची परीक्षा असते. जाधव सरांनी ती परीक्षा पार केली. शाळेचा परिसर सुंदर करण्याच्या या प्रयत्नातून गावकऱ्यांना एक गोष्ट जाणवू लागली. हा शिक्षक केवळ नोकरी करण्यासाठी आलेला नाही, तर शाळेसाठी आणि गावासाठी काहीतरी करण्याची त्याची मनापासून इच्छा आहे. विश्वासाचं हे बीज पुढे शाळेच्या इतर विकासकामांसाठीही महत्त्वाचं ठरलं. शाळेला सुविधा मिळवून देण्यासाठी माणसं जोडली… शाळेचा परिसर हिरवागार करण्याचा उपक्रम सुरू असतानाच जाधव यांच्या लक्षात आलं की, विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी आणखी अनेक गोष्टींची गरज आहे. केवळ चांगला परिसर असून चालणार नव्हतं. मुलांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकता याव्यात, यासाठी शाळेत आवश्यक सुविधा असणं गरजेचं होतं. मात्र, या सुविधा निर्माण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होईलच, याची शाश्वती नव्हती. सरकारी शाळांमध्ये अनेकदा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना विविध मर्यादा येतात. अशा वेळी केवळ शासनाकडे अपेक्षा ठेवून बसण्यापेक्षा उपलब्ध साधनसंपत्ती आणि गावातील लोकांचा सहभाग यांचा उपयोग करता येईल, असा विचार जाधव यांनी केला. त्यांनी गावकऱ्यांना आणि इतर संबंधितांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. शाळा ही केवळ शिक्षकांची किंवा विद्यार्थ्यांची नसून संपूर्ण गावाची आहे, ही भावना त्यांनी लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शाळेत एकूण आठ वर्ग होते आणि पाच शिक्षक. त्यामुळे सर्वानी मिळून बहुवर्ग अध्यापन पद्धत सुरू केली. पण संख्या जरी कमी असली तरी शिक्षणात तडजोड झाली नाही पाहिजे ही भावना त्यांच्या मनात होती. पांडुरंग सर सांगतात, ‘सुरुवातीला शाळेच्या विकासासाठी पैसे कसे उभे राहतील, कोण मदत करेल, किती मदत मिळेल, असे अनेक प्रश्न होते. मात्र, हार मानायची नाही हे ठरवलं होतं. मुलांना जर आपण प्रोजेक्टर किंवा स्मार्ट टीव्हीवर शिकवलं तर त्यांची गोडी वाढेल. त्यांनी गावकऱ्यांना ही शाळेची गरज समजावून सांगितली. मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करणं का आवश्यक आहे, हे पटवून दिलं. या प्रयत्नांतून शाळेसाठी गावकऱ्यांनी पुढे येत लोकवर्गणी जमा केली आणि शाळेसाठी प्रोजक्टर घेतला. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची सुविधा निर्माण झाली. अशा अनेक आवश्यक गोष्टी शाळेत उपलब्ध झाल्या. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं शिक्षण न मिळता विविध माध्यमांतून शिकण्याची संधी मिळाली. गावकर्यांच्या या आधाराशिवाय हा विकास होऊ शकला नसता.’ या लोकसहभागाच्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्याचा मार्ग खुला झाला, तर ग्रंथालयामुळे पुस्तकांच्या जगाशी विद्यार्थ्यांची मैत्री होण्यास मदत झाली. या सुविधा म्हणजे शाळेच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे होते. जाधव यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शाळेच्या विकासाला स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही. शाळेसाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी माणसं जोडली. लोकांना शाळेच्या कामात सहभागी करून घेतलं. त्यामुळे शाळेच्या विकासात गावाचाही सहभाग निर्माण झाला. मुलांना शाळेची गोडी लावण्याची वेगळी पद्धत… शाळेत चांगल्या सुविधा असणं महत्त्वाचं असलं, तरी विद्यार्थ्यांना शाळेत यावंसं वाटणं त्याहून महत्त्वाचं आहे. मुलांच्या मनात शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली नाही, तर केवळ इमारत किंवा सुविधा त्यांना शाळेशी जोडू शकत नाहीत. ही गोष्ट पांडुरंग जाधव यांनी ओळखली होती. प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येकाची आवड, क्षमता, विचार करण्याची पद्धत आणि शिकण्याची गती वेगळी असते. काही मुलांना चित्र काढायला आवडतं, काहींना खेळायला, तर काहींना वेगवेगळ्या कलांमध्ये रस असतो. अशा वेळी प्रत्येक मुलाला एकाच पद्धतीने शिकवण्याऐवजी त्याच्या आवडीनुसार शिक्षण दिलं, तर त्याचा शिकण्यातील सहभाग वाढू शकतो. याच विचारातून जाधव सरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना महत्त्व देण्यास सुरुवात केली. मुलांना त्यांच्या आवडीनुसार संधी देऊन त्यातूनच शिकवण्याची पद्धत त्यांनी अवलंबली. शिक्षणाला मनोरंजनाची जोड दिली. मुलांना शिकवताना त्यांच्या आवडीचा विचार केला. शाळा म्हणजे केवळ पुस्तकं, गृहपाठ, परीक्षा आणि गुण मिळवण्याचं ठिकाण नाही, तर आनंदाने शिकण्याचं ठिकाण असलं पाहिजे, हा विचार त्यांच्या अध्यापनातून दिसून येतो. मुलांना ज्या गोष्टीत रस आहे, त्याचा उपयोग शिक्षणासाठी करता आला, तर अवघड वाटणाऱ्या गोष्टीही सहज शिकता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील सहभाग वाढू लागला. शाळेत येण्याची त्यांची इच्छा वाढली. शाळेतील वातावरण अधिक आनंददायी होऊ लागलं. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातंही अधिक मोकळं झालं. या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम विद्यार्थी संख्येवरही दिसून आला. ज्या शाळेत सुरुवातीला अवघे 95 विद्यार्थी होते, त्या शाळेत आता 275 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढणं हा केवळ आकड्यांचा बदल नाही. तो पालकांचा शाळेवरील वाढता विश्वास आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक वातावरणाची पावती आहे. पांडुरंग सर सांगतात की, ‘शाळेत आठवड्याचा उपक्रम, स्नेहसंमेलन, चित्रकला स्पर्धा, खेळ, बुद्धिबळ यांसारख्या अनेक गोष्टी ज्यात विद्यार्थ्यांना रस आहे ते करण्याचा प्रयत्न सुरू केले. मूळ केवळ कलेतच नाही तर अभ्यासात देखील पुढे आहेत. गेल्या वर्षी शाळेला आयडियल सेंटर मिळालं. त्यावर मुलं आता NMMS परीक्षेची तयारी करतात. शाळेच्या सात वर्ष्याच्या इतिहासात या परीक्षेत 53 मुलांनी 48 हजारांची स्कॉलरशिप आणली आहे. त्यामुळे प्रयत्न केला की फळ हे मिळतच.’ विशेष म्हणजे आता केवळ जळगाव मोटा गावातीलच विद्यार्थी या शाळेत शिकत नाहीत, तर इतर 16 गावांमधूनही विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. एका जिल्हा परिषद शाळेने परिसरातील पालकांचं लक्ष वेधून घेणं, ही तिच्या कामाची महत्त्वाची उपलब्धी आहे. जाधव सर एका विद्यार्थ्यांचं उदाहरण देतात, ‘एक राहुल मेटे म्हणून आठवीचा विद्यार्थी होता. शाळेला 2015 चे ISO च मानांकन मिळणार होतं. त्यावेळी या मुलाला विचारण्यात आलं की तुला मोठेपणी काय व्हायचं आहे. तो त्यावेळी आमच्या शाळेचा मुख्यमंत्री होता. त्याने त्यावेळी संगीतल की मला माझ्या सरांनी सांगितलं आहे की विपरीत परिस्थितीत बिलकुल हार मानायची नाही. जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेला तेव्हा कोविडचा काळ होता. बाहेर कुठे जाता येत नव्हते. खाण्यासाठी घरात तांदूळ होते. त्यालाही कीड लागली होती. मात्र, माघार घेऊन आपण जर घरी गेलो तर पुन्हा कधीच येऊ शकणार नाही. या विचाराने त्याने जवळ जे आहे त्यात पोट भरलं. आज तो एक चांगल्या पोस्टवर काम करत आहे. सांगायचं मुद्दा हाच की तुम्ही मनाशी एखादी गोष्ट ठरवली तर तुम्ही ती करू शकता. फक्त हार मानायची नाही. हीच मुलं पुढे जाऊन जेव्हा नाव कमवतात तेव्हा त्यांचा शिक्षक म्हणून मला अभिमान वाटतो.’ पांडुरंग सरांच्या या शिकवणीमुळे सुट्टीच्या दिवशीही शाळेत येऊन सराव करतात. कोविड सारख्या भयंकर परिस्थितीतही त्यांनी शाळा चांगल्या पद्धतीने चालवली. स्वतः रिस्क घेऊन मुलांना स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी संभाजीनगरला घेऊन आले होते. सर सोबत आहेत म्हणल्यावर गावकऱ्यांनी देखील उसासा सोडला होता. शाळेच्या पलीकडेही पोहोचलेलं नातं… पांडुरंग जाधव यांच्या कामाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गावाशी त्यांनी निर्माण केलेलं नातं. सुरुवातीला शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांना सोबत घेणारे जाधव हळूहळू गावातील प्रत्येकाच्या विश्वासाचे व्यक्ती बनले. शिक्षक म्हणून त्यांची जबाबदारी वर्गातील विद्यार्थ्यांपुरती असली, तरी त्यांनी स्वतःला केवळ शाळेच्या चार भिंतींमध्ये मर्यादित ठेवलं नाही. गावातील लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि शक्य तिथे मार्ग काढण्यासाठी मदत करणं, हेही त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं. आज गावातील एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक अडचण आली, तरी ती व्यक्ती पांडुरंग जाधव यांच्याकडे येते. एखाद्या प्रश्नावर मार्गदर्शन हवं असेल, काही अडचण सोडवायची असेल, तर त्यांना बोलावलं जातं. त्यांच्यावर गावकऱ्यांचा असलेला विश्वास या नात्यातून स्पष्ट होतो. इतकच काय तर फॅमिली प्लॅनिंगसारख्या मुद्द्यावर देखील पांडुरंग सरांचे मत येथील गावकरी महत्त्वाचं मानतात. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं, तर ते सोडवण्याची जबाबदारी जाधव घेतातच, पण गावात दोन भावांमध्ये काही कारणाने वाद झाला, तरी तो मिटवण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. म्हणजेच, त्यांची भूमिका केवळ शिक्षकाची राहिलेली नाही, तर गावातील लोकांना विश्वासाने आपली अडचण सांगता येईल, अशा व्यक्तीची झाली आहे. एखाद्या गावात शिक्षकाला एवढा मान मिळणं ही सहज घडणारी गोष्ट नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे माणसांशी जोडून राहावं लागतं. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. आपल्या वागण्यातून विश्वास निर्माण करावा लागतो. जाधव यांनी आपल्या कामातून आणि स्वभावातून हे नातं निर्माण केलं आहे. शाळेच्या विकासासाठी त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणलं आणि त्याच प्रक्रियेत गावकऱ्यांशी त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं. त्यामुळे आज शाळेतील कोणताही उपक्रम असो किंवा गावातील एखादा प्रश्न, त्यांच्या सहभागाला महत्त्व दिलं जातं. जिल्हा परिषद शाळेत वाढलेली विद्यार्थी संख्या या बदलाचा ठळक पुरावा आहे. इतर गावांतील पालकही आपल्या मुलांना या शाळेत पाठवू लागले आहेत. याचा अर्थ शाळेने केवळ स्वतःच्या गावापुरतं अस्तित्व मर्यादित ठेवलं नाही, तर परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही शिक्षणाचं विश्वासार्ह ठिकाण म्हणून ओळख निर्माण केली आहे. या प्रवासात जाधव यांनी एक गोष्ट अधोरेखित केली आहे. शाळा बदलण्यासाठी केवळ मोठा निधी किंवा मोठ्या घोषणा आवश्यक नसतात. सर्वप्रथम बदल घडवण्याची इच्छा असणं गरजेचं असतं. त्यानंतर योग्य विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोकांना सोबत घेण्याची तयारी असेल, तर मर्यादित साधनांमध्येही मोठा बदल घडवता येतो. एका शिक्षकाने वर्गात शिकवलेल्या धड्यांपेक्षा वर्गाबाहेर केलेलं काम अधिक व्यापक परिणाम घडवू शकतं, याचं उदाहरण म्हणजे पांडुरंग जाधव. कारण त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांतील ज्ञान दिलं नाही, तर त्यांच्यासाठी शिकण्याचं वातावरण निर्माण केलं. शाळेला केवळ इमारत न ठेवता आनंदाने शिकण्याचं ठिकाण बनवण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांना शाळेशी जोडलं आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक म्हणून कायमचं स्थान निर्माण केलं.
Source link
तो राजहंस एक!:जळगाव मेटे ZP ची पटसंख्या 95 वरून नेली थेट 275 वर; आता 16 गावांतून येतात मुले, ज्ञानदीपमध्ये 'पांडुरंगा'च्या सावलीत फुललेल्या नंदनवनाची गोष्ट