![]()
ए.एन.एम. (ANM) आणि जी.एन.एम. (GNM) अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) दुसऱ्या फेरीत पात्र विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिचर्या व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या फ्रीशिप आणि शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ए.एन.एम. आणि जी.एन.एम. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची निवड यादी 14 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या किंवा आपल्या पसंतीचे महाविद्यालय अथवा अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध न झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून ए.एन.एम. आणि जी.एन.एम. अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिचर्या व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांमधील प्रवेशासाठी 29 जून 2026 रोजीच्या शासन आदेशानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना उपलब्ध जागा, गुणवत्ता आणि त्यांनी नोंदविलेल्या पसंतीच्या पर्यायांनुसार प्रवेश दिला जात आहे. पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या फेरीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे. फ्रीशिप आणि शिष्यवृत्तीसाठी कॅप प्रवेश आवश्यक ए.एन.एम. आणि जी.एन.एम. अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप आणि शिष्यवृत्ती योजनांच्या लाभासंदर्भात महत्त्वाची बाब समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका क्रमांक 11991/2026 मध्ये 19 ऑक्टोबर 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अर्थात कॅपमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी फ्रीशिप आणि शिष्यवृत्ती योजनांच्या लाभासाठी पात्र राहतील. त्यामुळे शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी कॅप प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. केवळ संस्थेत प्रवेश घेण्याऐवजी निर्धारित केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेऊन प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्यांनीही प्रक्रिया पूर्ण करावी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहित मुदतीत प्रवेश निश्चित करावा. तर पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या किंवा पसंतीचा पर्याय उपलब्ध न झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेशासंदर्भातील सूचनांकडे लक्ष द्यावे. निर्धारित मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण न केल्यास प्रवेशाची संधी तसेच शासनाच्या शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप योजनांच्या लाभाबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मंडळाचे आवाहन ए.एन.एम. आणि जी.एन.एम. अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांना शासनाच्या विविध आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने कॅप प्रवेश प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत सहभाग नोंदवावा. तसेच पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनीही निर्धारित कार्यपद्धतीनुसार प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिचर्या व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे. हेही वाचा…. छठपूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुहू चौपाटीवर:म्हणाले, देव जात-पात, प्रांताचा भेदभाव करत नाहीत उत्तर भारतीय समाजाचा प्रमुख आणि श्रद्धेचा सण असलेल्या छठपूजेनिमित्त मुंबईसह ठाणे, भिवंडी, वसई-विरार परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. सूर्यदेव आणि छठी मैय्याची उपासना करण्यासाठी हजारो भाविकांनी समुद्रकिनारे, तलाव आणि नदी घाटांवर गर्दी केली होती. मुंबईतील जुहू चौपाटीवरही छठपूजेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर उपस्थित राहून भाविकांना छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, सूर्यदेव आणि छठी मैय्याचे महत्त्व सांगताना देव कधीही जात, पंथ किंवा प्रांत असा भेदभाव करत नाहीत, असे प्रतिपादन केले. सविस्तर वाचा….
Source link
ANM-GNM प्रवेशाची दुसरी कॅप फेरी सुरू होणार:फ्रीशिप आणि शिष्यवृत्तीसाठी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य