Headlines

महाराष्ट्राचा माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही:वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंनी मांडले परखड विचार




महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना म्हटले की, महाराष्ट्रातील सुरक्षित वातावरणामुळे अनेकजण येथे स्थायिक झाले आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीत महिलांना बसमध्ये प्रवास करतानाही भीती वाटते, तर मुंबई आणि पुण्यात सुरक्षिततेमुळे अनेक लोक स्थायिक झाले आहेत. ठाकरे यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही किंवा छेडछाड करत नाही. मोकळेपणा हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे. बाहेरील राज्यातील लोक महाराष्ट्रात येतात कारण येथील वातावरण देशात इतरत्र कुठेही नाही. राज ठाकरे हे ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेत ‘माझ्या मनातील महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता’ या विषयावर बोलत होते. यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष रोहित टिळक उपस्थित होते. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा संदर्भ दिला. महाराष्ट्राने कसे वागावे आणि कसे राहावे हे महाराजांनी त्याच काळात दाखवून दिले होते, असे ते म्हणाले. मराठी शब्दकोश निर्मितीचे कामही शिवाजी महाराजांनी केले, यावर त्यांनी भर दिला. ठाकरे यांनी पुढे सांगितले की, महापुरुषांच्या केवळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याऐवजी त्यांचे विचार आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे कर्तृत्व आणि ओळख काय आहे, याचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्यातील संत परंपरेने समाजाची वैचारिक मशागत केली, जातीभेद निर्मूलन केले आणि समाज घडवला. स्वच्छ भारत योजनेचे खरे दूत संत गाडगेबाबा होते, असेही ठाकरे यांनी नमूद केले. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मराठी भाषा प्राचीन असल्याने तिला हा दर्जा मिळाला आहे. हिंदी ही केवळ १५० वर्षांपूर्वीची भाषा असून तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आणखी एक हजार वर्षे लागतील. असे असतानाही हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ठाकरे यांनी भाषेबाबत कडवट राहण्याची गरज व्यक्त केली. कोणतीही भाषा वाईट नसते, परंतु आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *