![]()
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे, दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची विशेष पूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी पं. रघुनंदन पणशीकर यांनी गायनसेवा अर्पण केली, तसेच मंदिरात गणेशयागही पार पडला. पुराणांनुसार, श्री गणेशांचे विविध लीला स्वरूपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी आणि स्वर्गलोकात झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. दुर्मती राक्षसाने तिन्ही लोकांवर विजय मिळवून सर्वत्र विध्वंस सुरू केला होता. त्याचा वध करण्यासाठी पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारात प्रकट होऊन दुर्मती राक्षसाचा संहार केला. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची आकर्षक आरास करण्यात आली होती. श्रीगणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथांमध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूंच्या घरी त्यांची कन्या म्हणून जन्माला येते, तर श्री गणेश विनायक स्वरूपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. भारतीय संस्कृतीत वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतात याच दिवशी वैशाखी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष आणि शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने दूर व्हाव्यात, या सद्भावनेने दरवर्षी शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला जातो. ट्रस्टतर्फे सांगण्यात आले की, दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना या शहाळ्यांचा प्रसाद वाटण्यात येणार आहे.
Source link
दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य:पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त ट्रस्टतर्फे शहाळे महोत्सव