.

भारतीय जनता पार्टी मंगळवेढाच्या वतीने शहरात पश्चिम बंगाल, आसाम, पाँडेचेरी या राज्यात एकतर्फी विजय मिळवल्याबद्दल भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला. या विजयोत्सवामध्ये झालमोडी चे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान झालमोडी दुकानावरती जाऊन झालमुडी खात एक ट्रेंड निर्माण केला होता आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळाल्यानंतर झालमोडीचे वाटप केले जाईल, असे मोदींनी म्हटले होते. त्याचप्रमाणे मंगळवेढा शहरातही झालमोडी व जिलेबी वाटप करत विजयोत्सव साजरा केला. कित्येक वर्षाच्या प्रयत्नानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे आणि त्याचा आनंद भाजप कार्यकर्त्यांनी हलग्या वाजवत, फटाके फोडत केला. मंगळवेढा शहरातील दामाजी चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विजय उत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये कित्येक वर्षानंतर सामान्य कार्यकर्ता त्याठिकाणी झटत, झगडत संघर्ष करत राहिला आणि त्याचेच हे यश आज आपल्या सर्वांना दिसत आहे. हे यश एक-दोन महिन्याचे नसून कित्येक वर्षांच्या संघर्षाचे यश आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर पश्चिम बंगाल मधील सर्व असामान्य कार्यकर्त्यांचा आहे. यावेळी मंगळवेढा शहरांमधून बाइक रॅली काढत फटाके फोडत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. या वेळी जिल्हा सरचिटणीस संतोष मोगले, उपनगराध्यक्ष येताळा भगत, युवा मोर्चा अध्यक्ष सुदर्शन यादव, तालुकाध्यक्ष नागेश डोंगरे, खंडू खंदारे, संजय माळी, सुनील रत्नपारखी, सुशांत हजारे, जयदीप रत्नपारखी, विनायक बुरकुल उपस्थित होते.
प्रतिनिधी | अकलूज भाजपने पुद्दुचेरी,आसाम व पश्चिम बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्याबद्दल अकलूजमध्ये लाडू, पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने या तीन राज्यात सत्ता हस्तगत केल्याचे समजताच येथील सदुभाऊ चौकात माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला. सायंकाळी चार वाजलेपासून तालुक्यातील भाजप कार्यकर्ते हळूहळू चौकात जमा होऊ लागले. सायंकाळी सहाचे सुमारास माजी आमदार राम सातपुते यांचे आगमन होताच चौकात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. सातपुते यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू व पेढे भरवले. या वेळी सातपुते म्हणाले,भाजपचे कार्यकर्ते हे कुणाला न घाबरता संघर्ष करणारे असून या संघर्षातून त्यांनी पश्चिम बंगालमधील जुलमी सत्ता उलथवून लावली. त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यातील बँका,पतसंस्था मोडून खाल्ल्या होत्या. त्यांना घालवण्याचे काम करण्यात आले आहे. आपल्यालाही त्यांचेपासून प्रेरणा घेत देशाच्या कानाकोपऱ्यात कमळ फुलवायचे आहे.त्यादृष्टीने कामाला लागावे. यावेळी महादेव कावळे, डॉ. नीलेश ननावरे, सचिन शिंदे, किसन शिंदे, सचिन घोडके आदी उपस्थित होते.