![]()
शहरात दिवसेंदिवस भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना काढण्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नागरिकांनी वाहतूक व पार्किंगविषयी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन करत सम विषम तारखेला पार्किंग करणे सोयीचे होईल, असा उपाय सुचवला. येथील सदूभाऊ सांस्कृतिक हॉलमध्ये नागरिक व अधिकाऱ्यांच्या या विचार विनिमय बैठकीत जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, पोंदकुळे, पोलिस निरीक्षक नीरज उबाळे, सार्वजनिक बांधकाम अभियंता सुनीता पाटील, सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांनी शहरातील व्यापारी, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांचे रस्त्यावर अतिक्रमण व बेशिस्त पार्किंग यांच्यामुळे रस्त्याच्या रूंदीचा पुरेपूर उपयोग वाहतुकीसाठी होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होतेय. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी नागरिकांना सहन होत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच शिस्त पाळावी, असे आवाहन केले. या वेळी अनेक नागरिकांनीही आपल्या समस्या मांडत काही उपाय सुचवले. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहने व्यवस्थित लावून शिस्त पाळावी या वेळी मोहिते पाटील म्हणाले, शहरातील पार्किंग आणि वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही. अल्पवयीन मुले-मुली मोटार सायकली पळवत आहेत. रिक्षाना परवाने नाहीत. मोठे व्यापारी, दवाखाने, बँकांसमोर वाहनांची अस्ताव्यस्त गर्दी होतेय. वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. अकलूज शहरातील गर्दीच्या भागामध्ये लवकरच एकेरी वाहतूक व सम विषम तारखेला पार्किंग असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने वाहने शिस्तीत चालवावीत तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेत पार्किंग करावीत.
Source link
अकलूजमध्ये सम विषम तारखेचे पार्किंग नियोजन:नागरिक, व्यापारी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचना