![]()
तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाची कामे अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३ हजार ६०० जलतारा खड्डे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यास अवघा महिनाभराचा कालावधी उरला असताना ही प्रक्रिया रखडल्याने “जलतारा”ची कामे वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. हवामान तज्ज्ञांनी यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत जलसंधारणाच्या कामांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या योजनेचा उद्देश धोक्यात येण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, संबंधित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीदेखील कार्यारंभ आदेश देण्याची प्रशासकीय प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास विलंब होत आहे. जलतारा म्हणजे काय? ‘जलतारा’ हा शेतामध्ये तयार केला जाणारा शोषखड्डा आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम तो करतो. एका एकर क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे मोठ्या प्रमाणातील वाहून जाणारे पाणी या खड्ड्यात जिरवता येते. शासनाकडून अद्याप परवानगी मिळाली नाही ^जलतारासाठी शासनाकडून अजून परवानगी मिळालेली नाही. मनरेगाकडून २६२ कामे केली जातात. हे २६३ वे काम म्हणून अजून मान्यता मिळालेली नाही. मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. – रत्नाकर पगार, बीडीओ
Source link
पावसाळा तोंडावर; ‘जलतारा’चे आदेश नाहीत:सिल्लोडमध्ये 3600 शोषखड्ड्यांचे प्रस्ताव रखडले, शेतकऱ्यांत नाराजी