![]()
लग्न म्हटलं की केवळ अक्षता आणि मंगलाष्टके उरली नसून, त्यापूर्वीचा ‘प्री-वेडिंग शूट’ हा सोहळा आता तरुण जोडप्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. एकेकाळी यासाठी कोकण, गोवा, महाबळेश्वरची वाट धरणारी पावले आता स्वतःच्या अहिल्यानगर जिल्ह्याकडेच वळू ला
.
सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात असून ऐतिहासिक चांदबीबी महाल येथे दररोज ४ ते ५ जोडपी प्री-वेडिंग शूटसाठी हजेरी लावत आहेत. येथील दगडी बांधकाम आणि अष्टकोनी वास्तू ‘विंटेज लूक’साठी सर्वोत्तम मानली जाते. दुसरीकडे, अकोल्यातील भंडारदरा येथील निळे पाणी आणि सह्याद्रीच्या रांगा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून फोटोग्राफर दाखल होत आहेत. केवळ नैसर्गिक ठिकाणेच नव्हे, तर एकाच छताखाली युरोपियन गल्ल्या, राजवाडे अशा ३० हून अधिक थीम्स उपलब्ध असलेले खासगी स्टुडिओही नगरमध्ये या व्यवसायाला नवी उंची देत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान व ड्रोनचा वापर वाढल्याने स्थानिक फोटोग्राफर्सना जिल्ह्याबाहेरही मोठी मागणी आहे. आम्ही आधी शूटसाठी बाहेर जाण्याचा विचार केला होता, पण नगरमधील चांदबीबी महाल आणि भंडारदरामध्ये जे फोटो आले, ते पाहून आम्ही थक्क झालो, असा अनुभव छायाचित्रकार सचिन गायगोवे यांनी व्यक्त केला. . चांदबिबी महाल: डोंगरावरील ही वास्तू रोमँटिक आणि विंटेज लूकसाठी प्रसिद्ध आहे. .भंडारदरा धरण: येथील निसर्ग गोव्याच्या किनाऱ्यांची किंवा कोकणची आठवण करून देतो. .बनपिंप्री (काळभैरवनाथ मंदिर): येथील प्राचीन कोरीव काम आणि सभामंडप अतिशय देखणा आहे. .मुळा धरण: विशाल जलसाठा आणि शांत परिसरामुळे जोडप्यांची येथे मोठी गर्दी होत आहे. या नव्या ट्रेंडमुळे केवळ फोटोग्राफर्सच नव्हे, तर मेक-अप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट आणि ड्रेस डिझाइनरना मोठा रोजगार मिळत आहे. शूटिंग लोकेशन्सच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि वाहन चालकांच्या उत्पन्नात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. “प्रशासनाने या ठिकाणी कपडे बदलण्यासाठी खोल्या व स्वच्छतागृहांची सोय केली, तर स्थानिक पर्यटनाला आणखी चालना मिळेल,” असे मत सिनेमॅटोग्राफर आकाश बनकर यांनी व्यक्त केले. मुंबई-पुण्यातील प्रचंड खर्च टाळण्यासाठी अनेकजण आता नगरला पसंती देत आहेत.
जिल्ह्यातील फोटोसाठी “ही’ ठिकाणे ठरतायत हॉटस्पॉट