Headlines

लग्नसराईत नेवासे तालुक्यात वाहतूक कोंडी; महामार्गांवर वाहनांच्या रांगा‎:चाळीशी पार तापमानात‎ नागरिक कोंडीत होरपळले‎




प्रतिनिधी |नेवासे तालुक्यासह परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अधिक मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहाचे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहेत. परिणामी, एकाच मुहूर्तावर शेकडो विवाह सोहळे पार पडत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते आणि मुख्य महामार्ग वाहनांनी ओसंडून वाहत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पूर्वी वाहतूक कोंडीची समस्या केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. आता मात्र नेवासा फाटा, कुकाना, घोडेगाव, सोनई आणि नेवासे शहरात दोन-दोन तास वाहनांच्या रांगा लागत आहेत. भर उन्हाळ्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेलेले असताना, लग्न समारंभ आटोपून बाहेर पडणारी हजारो वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडत आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर ना ट्रॅफिक पोलीस दिसतात ना महामार्ग पोलिसांचा वावर! नागरिक आणि वाहनचालक उन्हात होरपळत असताना संबंधित कर्मचारी मात्र सावली शोधून बसल्याचे चित्र दिसत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शुक्रवारचा घोडेगाव बाजार आणि रविवारचा सोनई तसेच नेवासा बाजारच्या दिवशी जर लग्नाचा मुहूर्त असेल, तर परिस्थिती अधिकच बिकट होते. या कोंडीत रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवा देणारी वाहने तासनतास अडकून पडत आहेत. मंगल कार्यालयांना परवानगी देताना पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाच्या अटी घातल्या जातात, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नेवासेकर विचारत आहेत. शेवटचा मोठा मुहूर्त असल्याने १४ मे रोजी ‘महाकोंडी’चे सावट येत्या १७ मे पासून अधिक मास सुरू होत असल्याने आता लग्नाचे केवळ शेवटचे सात दिवस उरले आहेत. यातही १४ मे हा या हंगामातील शेवटचा मोठा मुहूर्त असल्याने त्या दिवशी तालुक्यात अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या काळात मे महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होऊ शकते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने विशेष नियोजन करून प्रमुख चौकांमध्ये कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *