Headlines

वाशीम-वारंगाफाटा मार्गावर दुरुस्तीची वेळ:1976 कोटींच्या महामार्गाचे तीन वर्षांतच 'पितळ उघडे'; खानापूरचित्ता शिवारात पूर्ण पॅनलच काढले




वाशीम ते वारंगाफाटा या ७६ किमी राष्ट्रीय महामार्गावर खानापूरचित्ता शिवारात रस्त्यावरील संपूर्ण पॅनलच बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी अवघ्या तीन वर्षातच दुरुस्तीचे काम करावे लागत असल्याने उदघाटन कार्यक्रमात रस्ता गुणवत्तेचेे गोडवे गाणाऱ्या लोकप्रतिनिधी चांगलेच तोंडघाशी पडल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून वाशीम ते वारंगाफाटा हा सुमारे ७६ किलो मिटरच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होेते. या कामांवर सुमारे १९७६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वाशीम ते वारंगाफाटा मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन गतीमान प्रवास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानंतर या रस्ते कामांचे उदघाटन फेब्रुवारी २०२३ मध्ये केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या उदघाटन कार्यक्रमात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या गुणवत्तेचे गोडवे गायले. यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांना देखील खूष करून टाकले. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी देखील कामाचे कौतूक केले होते. मात्र रस्ते कामाचे उदघाटन झाल्यानंतर अवघ्या एक वर्षातच सिमेंट रस्त्यावर भेगा पडू लागल्या होत्या. त्यानंतर कंत्राटदाराने या भेगा बुजविल्या मात्र आता तर भेगा वाढल्यामुळे चक्क पॅनलच बदलण्याची वेळ आली आहे. हिंगोली तालुक्यातील खानापूरचित्ता शिवारात पुन्हा एकदा रस्ता खोदकाम करून पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे काम देखील संथ गतीने सुरु असल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या तीन वर्षातच होणाऱ्या दुरुस्तीमुळे कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता सदर कामांची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून पुढील १० वर्षापर्यंत त्यांच्याकडूनच दुरुस्ती केली जाणार आहे. यासोबचत आता हा रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *