![]()
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या हस्ते नू.म. वि. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यावसायिक विठ्ठल मणियार आणि ज्येष्ठ उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनी ‘राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते’ असे मत व्यक्त केले. सावंत म्हणाले की, आयुष्याच्या वाटचालीतील विद्यार्थी दशा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात पालक आणि गुरूजनांकडून मिळणाऱ्या संस्कारांमधूनच राष्ट्राची पायाभरणी होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना केवळ साक्षर केले जात नाही, तर सक्षमही बनवले जाते. या सक्षमतेबरोबरच जीवनाची सार्थकता कशात आहे, हे देखील शिकवले जाते. बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर पुरस्कारार्थींसह आम्ही नूमवीयचे अध्यक्ष अजित रावेतकर, सचिव मिलिंद शालगर, उपाध्यक्ष मोहन उचगावकर, कार्याध्यक्ष किशोर लोहोकरे, सहकार्यवाह अभिषेक पापळ आणि मुख्याध्यापक प्रकाश कांबळे उपस्थित होते. आपण सगळे २० व्या शतकातील शाळेत शिकलो असलो, तरी आपली पुढची पिढी २१ व्या शतकातील शाळेत शिकणारी आहे, याचे भान बाळगणे आवश्यक आहे, असेही सावंत यांनी नमूद केले. मराठी शाळेतून विद्यार्थ्यांची होणारी गळती रोखण्यासाठी त्यांना ‘पळती – टिकती – शिकती आणि कमावती’ कसे करता येईल, यासाठी सर्वांनी मिळून कटिबद्ध होण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या काठिण्यामुळे न्यूनगंड बाळगला जायचा. परंतु, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासामुळे न्यूनगंडाच्या या शृंखला गळून पडल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. आज फक्त गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण जमलो नसून, भविष्याचा वेध घेऊन कोणते उपक्रम राबवता येतील, याबाबत उहापोह होणे जास्त आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. सावंत यांनी गुरूची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले की, अध्यापक हा माहितीचे भांडार उघडून देतो, पंडित चिकित्सक पद्धतीने विचार करायला लावतो, आचार्य विद्या शिकवतो, द्रष्टा दूरदृष्टी देतो, प्रभावी प्रेरणा देतो. त्याचबरोबर भावना, विचार आणि वर्तनात मूलभूत परिवर्तन घडवून आणणारा आणि स्वविषयक अंधःकार दूर करण्यासाठी मदत करणारा तो खरा गुरू असतो.
Source link
'राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते':नूमवी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विवेक सावंत यांचे प्रतिपादन