![]()
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विशाल पाटील खासदार व्हावे अशी जयंत पाटलांची इच्छा होती का? सगळ्या नेत्यांच्या मुलांचे लॉन्चिंग झाले. पण त्यांच्या मुलाचे झाले नाही. त्यातही त्यांना आर आर पाटलांचा मुलगा (रोहित पाटील) आमदार झाला, अजित पवारांचा पोरगा खासदार झाला याचे सर्वात मोठे दुःख आहे, असे ते म्हणालेत. गोपीचंद पडळकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी किती प्रयत्न केले हे सर्वश्रूत आहे. जर ते विशाल पाटील यांना खासदार करू शकत असतील, तर त्यांनी त्यांच्या पोराला केले असते. सगळ्या पोरांचे लॉन्चिंग झाले. आर आर पाटलांचा मुलगा आमदार झाला, पण आपला नाही याचे सर्वात मोठे दुःख त्यांना आहे. अजित पवारांचे पोरगं खासदार झाले, पण जयंत पाटलांचे होईना, हे ही त्यांना दुःख आहे. त्यामुळे दुसऱ्याला खासदार करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याच पोराला केले असते ना. जयंत पाटलांनी मुलासाठी ना ना प्रयत्न केले गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटलांनी हातकणंगलेमध्ये चर्चा सुरू केली. मी स्वतः तेथील प्रभारी होतो. त्यामुळे मला सर्वकाही माहिती आहे. त्यांनी तिथे खूप ओढाताण केली. सांगलीतही पिल्लू सोडले की, माझा मुलगा उभा राहणार. भाजपमधून उभा राहणार. त्यांनी सर्वकाही करून पाहिले. ते स्वतःच 10 हजार मतांनी कसे तरी निवडून आलेत. त्यांना स्वतःचेच काय होईल हे माहिती नाही, तर विशाल पाटलांचे कशाला? बरं विशाल पाटील खासदार व्हावेत ही जयंत पाटील यांची इच्छा होती का? त्यांना आईची शपथ घालून विचारा की, विशाल पाटील खासदार व्हावेत. विश्वजित कदम यांना विचारा. तुम्हालाही माहिती आहे यात राजकारण काय झाले. संग्राम जगताप यांचेही केले कौतुक गोपीचंद पडळकर यांनी यावेळी आमदार संग्राम जगताप यांचेही तोंडभरून कौतुक केले. संग्राम जगताप हे अत्यंत ताकदीने हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी पुढे येऊन काम करत आहेत. त्यांच्या पक्षाची विचारधारा वेगळी असली तरी त्याची तमा न बाळगता ते अत्यंत झोकून देऊन काम करत आहेत. अहिल्यानगर हा मुस्लिमबहुल जिल्हा आहे. तिथे त्यांचे काम सुरू आहे. ते मतांचा विचार करत नाहीत. निवडणुकीचा विचार करत नाहीत. परंतु हिंदू धर्म टिकला पाहिजे. परंपरा टिकल्या पाहिजे. हिंदू मुलींच्या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्यातच सर्वात जास्त तक्रारी आहेत. त्यांनी तो विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पुढे आणला. त्या गोष्टीला माझे समर्थन आहे.
Source link
गोपीचंद पडळकर यांचे जयंत पाटलांवर तोंडसूख:म्हणाले – आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला याचे जयंत पाटलांना सर्वात मोठे दुःख