![]()
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीही चव्हाट्यावर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील ५ अश्वशक्तीचा सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात झाला होता. जिल्ह्यात वर्षात सरासरी ६९३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७३२ मि.मी. पाऊस झाला होता. खरीपनंतर रब्बीमध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामान्यांचा अंदाज होता. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. मार्चमध्येही प्रचंड तापले. मात्र मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक कर्जाचा डोंगर आणखी वाढला आहे. अशातच गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. गतवर्षीच्या खरीप, रब्बीनंतर यंदाच्या उन्हाळ्यातही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका १ हजार ४६७ शेतकऱ्यांना बसल्याचे संयुक्त पंचनाम्यातून पुढे आले. एकूण ९७५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे १ कोटी ६९ लाख २६ हजारांचे नुकसान झाले असून अहवाल आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला. सध्या शेतकऱ्यांना या मदतीची प्रतीक्षा असताना गत आठवड्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडला. शेतकऱ्याचा संताप नुकसान झाल्याबरोबर उमाळे यांनी संबंधित पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. मात्र कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे उमाळे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली आहे. ऐन उन्हाळ्यात पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. “आम्ही कर्ज काढून आणि कष्टाने हा सौर संच बसवतो. पण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आज आमचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच हे नुकसान झाले आहे, असा आरोप शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांनी केला आहे.
Source link
वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप