![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केले आहे. या परीक्षा राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतल्या जाणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता १२वीची लेखी परीक्षा मंगळवार, १६ जून २०२६ पासून सुरू होणार असून ती बुधवार, ८ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. तसेच १२वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा देखील याच कालावधीत घेतल्या जातील. दुसरीकडे, इयत्ता १०वीची लेखी परीक्षा १६ जून रोजी सुरू होऊन मंगळवार, ३० जून २०२६ रोजी संपणार आहे. १०वीच्या प्रात्यक्षिक परीक्षाही १६ ते ३० जून या कालावधीतच पार पडतील. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही अनधिकृत माध्यमांतून व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. केवळ शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडून मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानले जावे. चुकीच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षांचे नियोजन पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रकाची खात्री करूनच परीक्षेस प्रविष्ट व्हावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Source link
10वी, 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:जून-जुलै 2026 मधील परीक्षा 16 जूनपासून सुरू होणार