Headlines

निधीअभावी 47 गावांमध्ये जलजीवनची कामे थांबली:जिल्हा परिषदेला 18 कोटी रुपयांच्या शासकीय निधीची प्रतीक्षा




मेळघाटातील नऊ गावांमध्ये सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असतानाच, जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ४७ गावांमध्ये सुरू असलेली कामे निधीअभावी थांबली आहेत. या कामांसाठी केंद्र शासनाचे १५ कोटी आणि राज्य शासनाचे ३ कोटी असे एकूण १८ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. हा निधी वारंवार पाठपुरावा करूनही न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी हतबल झाले असून, कंत्राटदारांनी कामे आहे त्या स्थितीत थांबवली आहेत. निधीच्या अभावामुळे थांबलेल्या या कामांमुळे संबंधित गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. गावात पाण्याचा कोणताही स्रोत नसल्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे, ज्यामुळे त्यांची पायपीट वाढली आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ६६६ कामे सुरू आहेत, ज्यावर २६२ कोटी ८ लाख ८१ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी आजपर्यंत ६०७ कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित ५९ कामे रखडली आहेत. थांबलेल्या ५९ कामांमध्ये, नुकतीच सुरू झालेली परंतु निधीअभावी थांबलेली नऊ कामे आहेत. याशिवाय, २५ ते ५० टक्के पूर्ण झालेली आठ कामे, ५० ते ७५ टक्के पूर्ण झालेली सहा कामे आणि ९५ टक्क्यांवर अडकलेली २४ कामे यांचा समावेश आहे. या कामांमधून ४६ पैकी काही गावांमध्ये नवीन नळ योजना सुरू होणार होत्या, तर काही गावांमध्ये नळ योजनांची दुरुस्ती केली जाणार होती. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे संपूर्ण प्रक्रियेलाच खीळ बसली आहे. ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे थांबली आहेत, त्यामध्ये चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक १९ गावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, धारणी तालुक्यातील ८, धामणगाव रेल्वे, तिवसा आणि चांदूर बाजार तालुक्यातील प्रत्येकी चार, नांदगाव खंडेश्वर व अमरावती तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि भातकुली व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. या ४७ गावांमध्ये जलजीवन मिशनच्या एकूण ५९ योजना हाती घेण्यात आल्या होत्या. वाढत्या तापमानामुळे मेळघाटात आधीच पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यातील सुमारे १०५ गावांमध्ये पाण्यासाठी तीव्र संघर्ष सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील मोथा, खडीमल, गौलखेडा बाजार, बहाद्दरपूर, आकी, मेहरियम, आलाडोह यांसारख्या काही गावांमध्ये सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे धारणी तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांचीही भटकंती सुरू आहे. त्यात आता जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांमुळे पाणीटंचाईच्या समस्येत आणखी भर पडली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *