- Marathi News
- National
- BJP’s Jan Aakrosh Rally Across The Country, Kharge Should Apologize, His Statement Is Hurtful Rajnath
नवी दिल्ली/पाटणा9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने सोमवारी देशभरात निदर्शने केली. भाजपने खरगे यांचे वक्तव्य अशोभनीय आणि अपमानास्पद असल्याचे सांगत त्यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. भाजप नेते व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, खरगे यांनी माफी मागावी. माफी मागण्याऐवजी ते वक्तव्याचे समर्थन करत आहेत. पंतप्रधानांच्या दिवंगत वडिलांवरील या टिप्पणीमुळे मी स्तब्ध आणि दुखावलो गेलो आहे, असेही ते म्हणाले.
भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी पाटणा, गुवाहाटी आणि बेंगळुरूसह सर्व मोठ्या शहरांमध्ये निदर्शने केली. तसेच जनआक्रोश रॅली काढली. दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांनी राजाजी मार्ग येथील खरगे यांच्या घराजवळ निदर्शने केली. आंदोलकांना सेना भवन सर्कल ते खरगे यांच्या घरापर्यंत मोर्चा काढायचा होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्यासह सुमारे २०० कार्यकर्ते आणि नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई, रांची, कोलकाता आणि लखनौसह इतर शहरांमध्येही निदर्शने करण्यात आली.
काँग्रेस, भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर देतेय : मसूद
मोदी सरकारचे महागाई, बेरोजगारी रोखण्यातील अपयश, जनहिताच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून निदर्शने केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले की, भाजप नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे राहुल गांधी, सोनिया यांच्यावर असभ्य टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला.