मुंबई8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठ्या खासगी बँक HDFC बँकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्यावसायिक गुपिते (गोपनीय माहिती) लीक केल्याचा आरोप झाला आहे. बँकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोन्ही अधिकारी महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळत आहेत.
सध्या लीक झालेल्या माहितीचा गैरवापर झाला आहे की नाही, याचा तपास केला जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सांगितले जाते की, 27 ऑक्टोबर रोजी अनुप बागची बँकेची सूत्रे हाती घेतील.
बँकेची बाजू: चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारवाई करू
HDFC बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, बँकेने अधिकाऱ्यांची नावे किंवा चौकशीत काय निष्पन्न झाले, याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. बँकेचे म्हणणे आहे की, चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवालाच्या आधारे आवश्यक कारवाई केली जाईल आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या नियमांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
27 ऑक्टोबर रोजी नवे CEO अनुप बागची सूत्रे हाती घेतील
हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा २७ ऑक्टोबर रोजी अनुप बागची HDFC बँकेचे नवे CEO होणार आहेत. ICICI बँकेत दीर्घ अनुभव असलेले अनुप बागची HDFC बँकेची धुरा सांभाळणारे पहिले बाहेरील अधिकारी असतील. बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेले आरोप आणि सुरू असलेल्या उलथापालथीमुळे त्यांचे सुरुवातीचे दिवस आव्हानात्मक ठरू शकतात.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे आणि वादांमुळे वाढली खळबळ
गेल्या काही महिन्यांपासून बँकेतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत आहेत:
- अध्यक्षाचा राजीनामा: यावर्षी मार्चमध्ये बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी बँकेच्या कार्यपद्धती त्यांच्या तत्त्वांशी जुळत नसल्याचे सांगत अचानक राजीनामा दिला. मात्र, बँकेच्या चौकशीत त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही.
- CEO पदावरून दूर होण्याचा निर्णय: विद्यमान CEO शशिधर जगदीशन यांनी 6 वर्षे काम केल्यानंतर यापुढे पदावर न राहण्याचा अचानक निर्णय घेतला, त्यानंतर नव्या CEOचा शोध सुरू झाला.
- उपप्रमुखही साथ सोडत आहेत: बँकेचे बरेच जुने आणि वरिष्ठ अधिकारी, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर कैजाद भरूचा यांनीही डिसेंबरमध्ये पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शेअर 28% घसरला, 10.86 लाख कोटी रुपयांची कंपनी
1994 मध्ये सुरू झालेल्या HDFC बँकेचे एकूण मूल्य सुमारे 10.86 लाख कोटी रुपये आहे. मात्र, अंतर्गत वाद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे यावर्षी त्याच्या शेअरच्या किमतीत सुमारे 28% मोठी घसरण झाली आहे.