![]()
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या निर्घृण हत्येमुळे गेल्या तीन दिवसांपासून केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजर
.
हत्या प्रकरणाच्या एफआयआर आणि तपासावर संशय व्यक्त करताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, “पोलिसांनी सुरुवातीला मला जेव्हा या प्रकरणाची माहिती (ब्रीफ) दिली, तेव्हा कुठेही माझ्या मुलाचे नाव नव्हते. पहिल्या एफआयआरमध्येही कोणाचे नाव नव्हते. विलास घुलेच्या मृत्यूनंतर अचानक काय घडले? कुठे कट रचला गेला? कोणाचे फोन आले? हे मला माहीत नाही. आधी सोशल मीडिया आणि चौकाचौकात झालेल्या आंदोलनात माझ्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि खासदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. या आंदोलनामागे कोणती डोकी होती, ते कोणत्या गुन्ह्यांत बरबटलेले आहेत, हे मला सगळं माहीत आहे; पण मला सध्या त्या खोलात जायचे नाही.”
ते पुढे म्हणाले, “रविवारपर्यंत या प्रकरणात आमचे नाव नव्हते, पण सोमवारी अचानक माझ्या मुलाचे नाव यात गोवण्यात आले. हे का आणि कोणाच्या सांगण्यावरून झाले, हे मला माहीत नाही.”
माझा मुलगा घरीच आहे, मी त्याला पळवून लावले नाही
तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेत खासदारांनी पोलिसांना निपक्षपाती तपासाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “मी माझ्या मुलाला कुठेही पळवून लावलेले नाही, तो घरीच आहे. पोलिसांनी माझ्या घराचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत, सीडीआर देखील काढले आहेत. खासदार असल्यामुळे माझे सीडीआर काढताना काही कायदेशीर बंधने आहेत, पण मी स्वतः एसपी साहेबांना माझेही सीडीआर तपासण्याची लेखी परवानगी देतो. काय चौकशी करायची ती करा, पण आमची विनाकारण बदनामी करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.”
धनंजय मुंडेंचे नाव न घेता सणसणीत टोला
या प्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केली होती. यावर बोलताना बजरंग सोनवणे यांनी मुंडेंचा खरपूस समाचार घेतला. पूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोनवणेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा राजकीय सूड उगवला जातोय का? या प्रश्नावर ते म्हणाले, “माझ्यावर सूड उगवणारे कोण आहेत? त्यांना काय उगारायचे ते उगारू द्या, मी इथेच आहे. मला यांचे सगळे अंडे-पिल्ले माहीत आहेत. लोकांना कोण पेटवतंय, चिथावणीखोर भाषणे कोण करतंय, हे बीडची जनता जाणते. आमची चौकशी करण्याआधी स्वतःचे रेकॉर्ड बघा. माझी मुले चांगली आहेत, याचे तुम्हाला वाईट वाटते का? तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि बिल आमच्या नावावर फाडाल, तर हे तुम्हाला सोपे जाणार नाही. मी कोण आहे, हे पुढच्या काळात दाखवून देईन.”
विरोधी खासदाराचा दबाव पोलिसांवर असेल तर मला आनंदच!
सत्ताधारी नेत्यांकडून पोलिस तपासावर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जात असल्याच्या मुद्द्यावर खासदारांनी उपरोधिक टोला लगावला. “मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. जर सत्तेत असलेला आमदार (धनंजय मुंडे) म्हणत असेल की पोलिसांवर राजकीय दबाव आहे, तर मला माझ्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो. सत्तेत असूनही पोलिस तुमचे ऐकत नाहीत आणि विरोधी पक्षाच्या खासदाराचा दबाव घेत असतील, तर मला याचा नक्कीच आनंद आहे,” असे म्हणत सोनवणेंनी मुंडेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केजमधील या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय संघर्ष आता अत्यंत टोकाला पोहोचला आहे.