‘नीट’ पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ ठाकरे बंधूंनी (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र येत २६ जुलै रोजी (शुक्रवारी) मुंबईत महामोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चाला आता मोठे स्वरूप प्राप्त होत असून
.
काँग्रेसचा सहभाग आणि महाविकास आघाडीची रणनीती
गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता मुंबईत मोठे बळ मिळणार आहे. काल (२३ जुलै) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची घोषणा केली होती, आणि सर्व राजकीय पक्ष व पालकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “जर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र येत असतील, तर आम्हाला त्यात सहभागी होण्यास कोणतीही हरकत नाही.”
या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची (मविआ) एक विशेष बैठक पार पडणार आहे. त्यामुळे येत्या २६ जुलैला मुंबईच्या रस्त्यांवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेतेही एकाच मंचावर दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांसाठी ‘युवासेना’ बनणार सुरक्षा कवच
या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत तसा प्रकार घडू नये यासाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि युवासेना विशेष खबरदारी घेत आहे.
आदित्य ठाकरेंचे निर्देश
या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी युवासेनेची एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. “मोर्चात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घ्या. या मुलांवर पोलिसांची कोणतीही कारवाई होणार नाही, याची दक्षता घ्या. युवासेनेने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून मैदानात उतरावे,” अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
ठाकरे बंधूंच्या या मोर्चावरून सत्ताधाऱ्यांनीही लगेचच पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची आठवण करून देत त्यांच्यावर कडाडून टीका केली.
टीईटी घोटाळ्याची आठवण
फडणवीस म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना आठवण करून देतो की, राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘टीईटी’ (TET) घोटाळा ते मुख्यमंत्री असतानाच झाला होता. या घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्यांपासून अनेक जण सामील होते.”
‘दुसऱ्यांचं बघायचं वाकून…’
फडणवीसांनी पुढे आरोप केला की, “उद्धव ठाकरेंच्या काळात केवळ घोटाळाच झाला नाही, तर जे विद्यार्थी नापास होते त्यांना पैशांच्या जोरावर पास करण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले. आम्ही परीक्षा घेण्यापूर्वीच घोटाळेबाजांना पकडले. त्यामुळे ‘स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून’ हे प्रकार त्यांनी आधी बंद करावेत.” एकीकडे ठाकरे बंधू, काँग्रेस आणि मविआची एकत्रित मोट, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा पलटवार, यामुळे 26 जुलै रोजी होणारा हा महामोर्चा मुंबईच्या आणि राज्याच्या राजकारणात एक मोठी ठिणगी टाकण्याची शक्यता आहे.
संबंधित बातमी वाचा..
राहुल गांधींची नौटंकीच, विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र योग्य:बावनकुळे यांचा पुनरुच्चार, कर्जमाफीसह पोलिस कारवाईवरही दिली माहिती

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील आणि देशातील विविध महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर सरकारची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यात राहुल गांधींचा सहभाग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि पोलिसांच्या वादग्रस्त कारवाया या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी