Headlines

NEET पेपरफुटीचा भडका:"ज्यांना कुटुंब नाही, त्यांना लेकरांची किंमत काय?", वांगचुक यांना उचलल्यानंतर दीपके दाम्पत्याची पंतप्रधानांवर टीका




NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र भावनिक आणि राजकीय वळण लाभले आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणस्थळावरून बळजबरीने हटवल्यानंतर आंदोलक कमालीचे आक्रमक झाले आहेत. या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले असून, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके याने आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. दरम्यान, अभिजित यांच्या या पवित्र्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. “लोकशाही धोक्यात, ही गुलामगिरीची सुरुवात” – भगवानराव दीपके अभिजितचे वडील भगवानराव दीपके यांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये भारतीय जनतेची ही मोठी चूक ठरली आहे की त्यांनी अशा व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवले, ज्याला संसाराचा, कुटुंबाचा किंवा मुलाबाळांचा कोणताही अनुभव नाही. ज्याला कुटुंबाची काळजी नसते, त्याला देशातील मुलांच्या भविष्याची काय पडली असणार? या चुकीचे परिणाम आज संपूर्ण देश भोगत आहे.” पुढे बोलताना त्यांनी अत्यंत संतप्त भाषेत, “परमेश्वराने नरेंद्र मोदी यांना सुबुद्धी द्यावी आणि त्यांनी विद्यार्थ्यांचे ऐकून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी केली. “आता माझी भीती संपली आहे, सत्ता कोणाच्या बापाची जहागीर नाही. पाच वर्षांत सत्ता कशी बदलते हे देशाने पाहिले आहे. एका मंत्र्याला हटवल्याने सरकार कोसळत नाही, पण सरकार अहंकारात बुडाले आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. “माझा मुलगा अमेरिकेतील नोकरी सोडून देशासाठी आला, पण इथे…” भगवानराव दीपके यांनी आपल्या मुलाच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त करताना सांगितले की, अभिजित हा परदेशात उत्तम शिक्षण घेऊन सेटल झाला होता. कर्ज काढून त्याला शिकवले होते, परंतु भारतात NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या पाहून तो भावनेच्या भरात देशात परतला. वडिलांचा सल्ला: “मी त्याला आधीच बजावले होते की भारतात येऊ नको, इथले राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. गंगा शुद्धीकरणासाठी लढणाऱ्या जी. डी. अगरवालांसारख्या मोठ्या व्यक्तींची जिथे काळजी घेतली गेली नाही, तिथे इतरांची काय कथा? पण तो ऐकला नाही आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ‘कॉक्रोच पार्टी’ काढून रस्त्यावर उतरला.” “उद्या अभिजितलाही गायब केले तर?” – आईचा डोळ्यात पाणी आणणारा सवाल सोनम वांगचुक यांना पहाटेच्या वेळी ज्या प्रकारे पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यावरून अभिजितची आई अनिता दीपके यांनी आपल्या मुलाच्या सुरक्षेविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “जसे वांगचुक सरांना सकाळी झोपेतून पडदा टाकून गुपचूप उचलून नेले, तसेच जर उद्या माझ्या अभिजितबाबत झाले तर आम्ही काय करायचे? आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? सरकार इतके निर्दयी कसे असू शकते? लहान मुलाने बिस्किटाचा पुडा मागितला तरी आई-वडील देतात, इथे देशातील मुले हक्क मागत आहेत आणि सरकार दुर्लक्ष करत आहे.” संपूर्ण कुटुंबच उतरणार उपोषणाला! आपल्या एकुलत्या एक मुलाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून दीपके दाम्पत्याने आता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. “आम्ही घरात बसून काय करणार? जर सरकारला आमच्या लेकरांची काळजी नसेल, तर आई-वडील म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही,” असे सांगत येत्या रविवारपासून भगवानराव दीपके आणि अनिता दीपके हे दोघेही दिल्लीत आपल्या मुलासोबत आमरण उपोषणाला बसणार आहेत. NEET प्रकरणावरून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता पालकांच्या या भूमिकेमुळे एक भावनिक धार आली असून, संपूर्ण देशाचे लक्ष जंतर-मंतरवरील या आंदोलनाकडे लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *