- Marathi News
- National
- NEET Paper Leak! Why Not Register A Case? Evidence Will Be Sent To NTA, National Testing Agency’s Expert Committee Will Take The Final Decision
अवधेश आकोदिया | जयपूर4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठ्या परीक्षांपैकी एक असलेल्या नीटवरील पेपरफुटीचे ढग फाटण्याच्या तयारीत आहेत. ३ मे रोजी देशभरात झालेल्या नीटचा पेपर फुटला होता, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. एसओजीने ज्या १५ जणांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्या चौकशीचे निष्कर्ष सांगतात की तपास पेपरफुटीच्याच दिशेने पुढे जात आहे.पुरावेही पुरेसे आहेत. राजस्थान पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) सर्व पुरावे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) तज्ज्ञ समितीला पाठवण्याच्या तयारीत आहे. नीटचा पेपर फुटला आहे की नाही, याची अंतिम घोषणा एनटीएच करेल. तथापि, एसओजी २-३ दिवसांत काही मोठा गौप्यस्फोट करेल, असे एसओजीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
तपास यंत्रणेने सोमवारी आणखी ४ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये जयपूरमधून पकडलेला मास्टरमाइंड मनीषचाही समावेश आहे. पेपर केरळमार्गे कोणत्या राज्यांमधून कुठे-कुठे विकला गेला आणि यादरम्यान किती पैशांचा व्यवहार झाला, याचा शोध घेण्यात एसओजी गुंतली आहे.
जबाबदारी कुणी घ्यायची : एनटीए एफआयआर नोंदवण्यास तयार नाही, एसओजी करत नाहीये
एसओजीने सोमवारी आतापर्यंतच्या तपासाबाबत एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांना माहिती दिली, तेव्हा त्यांनी यंत्रणेला स्वतः गुन्हा दाखल करण्याचा सल्ला देऊन हात झटकले. सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. एफआयआर दाखल न झाल्याने एसओजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण १५ हून अधिक संशयित सध्या त्यांच्या कोठडीत आहेत. नातेवाईक म्हणत आहेत की एक तर अटक करा किंवा सोडून द्या.
भास्करच्या तपासात समोर आले आहे की, पेपर छापण्यापूर्वीच प्रश्न कॉपीबहाद्दर टोळीपर्यंत पोहोचले होते. यात जीवशास्त्राचे ९० आणि रसायनशास्त्राचे ३५ प्रश्न होते. ‘लीक’चे धागेदोरे थेट जयपूरशी जोडले जात आहेत. आता सोमवारी जयपूरमधून अटक करण्यात आलेल्या मनीषचे संपूर्ण नेटवर्क तपासले जात आहे. हे नेटवर्क आणखी अनेक राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. टोळीने छापण्यापूर्वीच लीक झालेल्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्न मिसळून एक ‘क्वेश्चन बँक’ तयार केली. मनीषने आपल्या साथीदारांसह मिळून हे काम केले. एसओजी या सर्वांच्या शोधात आहे.