![]()
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जून २०२६ रोजी सलग ४९९३ दिवस पदावर राहण्याचा विक्रम पूर्ण करतील. त्यांच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा पाया रचला गेला आहे, असेही मोहोळ म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. २०१४ मध्ये जनतेने भाजप आणि एनडीएवर विश्वास ठेवून सत्ता दिली, त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, असे मोहोळ यांनी नमूद केले. यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नाना काटे, पुणे जिल्हा ग्रामीण (उत्तर) चे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) चे अध्यक्ष शेखर वढणे, अमोल कविटकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, प्रियांका शेडगे, रवींद्र साळेगावकर, प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर आणि अजय दुधाणे उपस्थित होते. मोहोळ यांनी सरकारच्या आर्थिक कामगिरीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पूर्वी ११ व्या स्थानावर होती, ती आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. महागाईबाबत चर्चा होत असली तरी, यूपीए सरकारच्या काळात ती १० टक्के होती, तर मोदी सरकारच्या काळात सरासरी ५.१ टक्के राहिली आहे. अनेक लोककल्याणकारी योजना सरकारने आणल्या असून, देशातील ५० टक्के जनता कोणत्यातरी योजनेची लाभार्थी आहे. यामुळे नवीन मतदारही तयार झाले आहेत. देशातील २५ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या वर आली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असे, परंतु आज १२ वर्षांत ५१ लाख कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे वाटप करण्यात आले आहेत. देशातील ८० टक्के जनतेला मोफत धान्य वाटप सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकासाचा दर प्रतिदिन ११ किमी होता, तो आता ३४ किमी दरदिवशी झाला आहे. मोठ्या प्रमाणात महामार्ग निर्मिती झाली आहे. रेल्वे जाळ्याचे विस्तारीकरण, विद्युतीकरण, भांडवल वाढ आणि वंदे भारत एक्सप्रेसचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पांनाही गती देण्यात आली आहे. पाच शहरातील २४८ किमी मेट्रो मार्ग २३ शहरांमध्ये एक हजार ९३ किमीपर्यंत विस्तारित करण्यात आले आहेत. लवकरच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली.
Source link
PM मोदी 10 जून रोजी 4993 दिवसांचा विक्रम करणार:विकसित भारताचा पाया 12 वर्षांत रचला गेला- मंत्री मुरलीधर मोहोळ