![]()
अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर येथे एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या स्लॅबचे काम सुरू असताना काँक्रीट भरणाऱ्या यंत्राचा (बूम) 11 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने दोन बांधकाम मजुरांचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पंचायत समितीसमोरील मुख्य रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून, बबन चंद्रकांत वाघमारे आणि यशवंत कोंडीराम वाघमारे अशी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या दुर्दैवी मजुरांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त होत असून मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंचायत समितीसमोर एका शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबची भराई करण्यासाठी काँक्रीट भरणारे वाहन (एमएच 44 एसक्यू 3044) मुख्य रस्त्यावर उभे करण्यात आले होते. या यंत्राद्वारे तीस फूट उंचावर काँक्रीट टाकले जात असताना यंत्राच्या पाईपचा स्पर्श रस्त्यावरून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत वाहिनीला झाला. यामुळे स्लॅबवर काम करत असलेले हमाल गल्ली येथील बबन वाघमारे (वय 50) आणि यशवंत वाघमारे (वय 33) यांना विजेचा जोरदार धक्का बसला. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मजुरांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अचानक ओढवलेल्या मृत्यूमुळे दोन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. मृत बबन वाघमारे यांच्या पश्चात दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. तर, यशवंत वाघमारे यांच्या दोन लहान मुलांच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी उंचावर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. कष्टकऱ्यांचे असे बळी जाणे अत्यंत वेदनादायी आहे.
Source link
अंबाजोगाईत मोठी दुर्घटना!:विजेचा तीव्र धक्का लागून दोन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, शहरात हळहळ