![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून प्रस्थान करतील आणि पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर व खोपोली मार्गे मुंबईत पोहोचतील. त्यांच्या या महत्त्वपूर्ण घोषणेवर महायुतीकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत तुम्हाला दौरे हवेत की प्रश्न सुटायला हवेत? असा सवालही उपस्थित केला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, मराठा समाजाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मराठा समाज राज्यातील मोठा समाज असल्याने हा विषय गंभीर आहे. या दृष्टीने सरकारने पूर्ण सहकार्य आणि चर्चा या संदर्भात केली आणि अनेक मंत्री तथा नेते त्या ठिकाणी गेले. 14 पैकी 12 मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. एक दोन मागण्या कायद्याच्या चौकटीत अडकलेल्या आहेत, त्यातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यामुळे सरकारने पूर्ण चर्चा केली आणखी चर्चेची तयारी आहे, त्यांना नेमके आणखी काय हवे आहे ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने जे काही केले आहे ते समाजाच्या उत्कर्षासाठी असल्याचे दरेकर म्हणाले. पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी जेवढे मराठा समाजासाठी सरकार म्हणून केले तेवढे कुठल्याही सरकारच्या काळात झालेले नाही. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, सुनेत्रा वहिनी असतील, हे सर्व नेते समाजासोबत आहेत. सरकारची चर्चा करण्याची अजुनही तयारी आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. तुम्हाला दौरे हवेत की प्रश्न सुटायला हवेत? तसेच तुम्हाला दौरे हवेत की प्रश्न सुटायला हवेत? तुमच्याकडे कोण येते, यापेक्षा सरकार दखल घेत आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे. राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड हे सर्वजण या ठिकाणी आले होते. मनोज जरांगे यांना भेटले होते. कोणी यावे, कोणी जावे यापेक्षा प्रश्नांची सोडवणूक होणे महत्त्वाचे आहे. सरकारने प्रश्नांची सोडवणूक केली आहे, असेही दरेकरांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत जाण्याचा सर्वांना अधिकार प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबईत जाण्याचा सर्वांना अधिकार आहे, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, सरकार कोणत्याही स्टेजला चर्चेसाठी तयार आहे, मुंबईमध्ये जाण्यासंदर्भात आक्षेप असण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण नाव घेतो, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सण, उत्सव साजरे करतो, त्या सण उत्सवाला गालबोट लागता कामा नये. गणपती श्रद्धेचा सण असून मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव असतो, आपल्यामुळे हिंदू सणाला अडचण येणार नाही याची दखल घ्यायला पाहिजे. तसेच मनोज जरांगे यांनी संयमाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे, शांततामय आंदोलन करून मराठा समाजाने शांततेत मूक मोर्चा काढले त्याची दखल घेतली ती ताकद आहे. आपल्या आंदोलनामुळे कुठलीही अर्जाकता निर्माण होणार नाही वातावरण खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही प्रवीण दरेकर यांनी केले आहे. सरकार आजही संवाद साधायला तयार पुढे प्रवीण दरेकर म्हणाले, तुम्ही सांगा आम्हाला काय करायचे? सरकार चर्चेला आहे, सरकार मंत्री पाठवत आहे, सरकार प्रश्नांची दखल घेत आहे, नेमका प्रॉब्लेम काय आहे हे आपणच विचारा. आजही सरकार संवाद साधण्यासाठी तयार आहेत. मागेल ते सर्व दिलेले आहे, आणखी सरकार देणार आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मनोज जरांगेंचा एल्गार, 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करणार:पाटोदा-खोपोलीमार्गे थेट आझाद मैदानात आमरण उपोषण; मार्ग जाहीर करताना जरांगे भावुक मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि सगेसोयरे तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. आपल्या आमरण उपोषणाच्या 15व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी मुंबईला जाण्याचा सविस्तर मार्ग, मुक्काम आणि आंदोलनाची संपूर्ण रणनीती जाहीर केली. “ही मराठ्यांची अंतिम आणि निर्णायक लढाई असून, आपण शांततेच्या मार्गाने मुंबईत जाऊन जिंकूनच माघारी येणार आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. इथे वाचा सविस्तर
Source link
मनोज जरांगेंचे 19 सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण:प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- तुम्हाला दौरे हवेत की प्रश्न सुटायला हवेत?