![]()
अकोले तालुक्यात गेल्या सुमारे आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. यामुळे भातखाचरांमधील लागवडी अंतिम टप्प्यात आल्या असून खरीप पिकांना जोरदार बळ मिळाले आहे. मात्र, मुसळधारेमुळे तालुक्यातील ५२ घरांचे नुकसान झाले. पांजरे शिवारात भूस्खलनाची घटना घडली आहे. जुलैच्या अखेरच्या टप्प्यात तालुक्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे: भंडारदरा धरण: धरण ९१.५७ टक्के भरले असून यात १०,१०९ दलघफू पाणीसाठा आहे. स्पिलवेमधून १,१०९२ क्युसेक्स आणि वीजगृहातून ८३० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. २४ तासांत ७६५ दलघफू पाण्याची आवक झाली आहे. निळवंडे धरण: धरण ९०.३२ टक्के भरले असून ७,५२७ दलघफू साठा आहे. २४ तासांत सुमारे एक टीएमसी (९७९ दलघफू) आवक झाल्याने नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. आढळा धरण: हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून २५२८ क्युसेक्सने ओव्हरफ्लो सुरू आहे. वाकी जलाशयातून १०२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. २४ तासांत घाटघर येथे ११५ मिमी, रतनवाडी ११४, भंडारदरा ११०, वाकी १०२, पांजरे ८१ मिमी तर अकोले शहरात ४ मिमी पावसाची नोंद झाली. या हंगामात घाटघर येथे २८७० मिमी विक्रमी पाऊस झाला आहे. पावसामुळे ४८ कच्ची, ३ पक्की आणि १ पूर्णतः कोसळलेले घर असे एकूण ५२ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच २ गायी व ८ शेळ्या दगावल्या असून सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. पांजरे येथे दरड कोसळल्याने वारंघुशी-चिचोंडी-शें डी-भंडारदरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. प्रशासन सतर्क, आमदार लहामटेंचे मदतीचे निर्देश घटनेचीची माहिती मिळताच आमदार डॉ. किरण लहामटे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे व सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी आपत्कालीन यंत्रणेसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीचे निर्देश दिले. डोंगराळ भागातील नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Source link
अकोले तालुक्याला पावसाचा तडाखा:धरणे ओसंडली, 52 घरांचे मोठे नुकसान, सर्व धरणे तुडुंब भरून सांडव्यावरून ओसंडून वाहताहेत, पांजरे शिवारात भूस्खलन