![]()
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंज येथील प.पु. कालिदास महाराज यांच्यावर दुपारी १:३० वाजता गुंज येथील गोदावरी काठी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांचा जनसागर ओसंडला होता. जवळ जवळ दोन- अडीच हजार भक्त महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आले होते. संपूर्ण गावातून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. कालिदास महाराजांचा छत्रपती संभाजीनगर येथील धुळे – सोलापूर हायवेवर पहाटे साडेसहा वाजता अपघात झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांच्या चुलत भावाची पत्नी स्मिता बोरीकर यांचाही मृत्यू झाला असून त्यांच्या लहान भावाचे जावाई आशुतोष डूगरीकर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुजरात मधील गरुडेश्वर येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून ते छत्रपती संभाजीनगर येथे येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. महाराजांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्ष मौनव्रत पाळले. त्यांचे गुरु प. पु. चिंतामणी महाराज यांच्या आज्ञेवरून त्यांनी अविरत ‘दिगंबरा दिगंबराचा’ जप केला. त्याचबरोबर मौनव्रत असूनही त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात दत्त संप्रदायाचा प्रचार- प्रसार केला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भक्त मंडळींवर शोककळा पसरली. महाराजांनी सर्वांच्या आयुष्याचे गणित सोडवले पण स्वतःचे सोडवायला विसरले या शब्दात भक्तांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.
Source link
अखेरचा निरोप:कालिदास महाराज अनंतात विलीन, गुंज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; संभाजीनगरमध्ये कार अपघातात निधन