![]()
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासह दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्तचर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लोकमान्य टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पुण्यातील टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९८३ पासून राष्ट्रीय प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्योगपती राहुल बजाज, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये जन्मलेले अजित डोवाल हे निवृत्त भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत. त्यांनी गुप्तचर विभागात दीर्घकाळ सेवा बजावली आहे. २०१४ पासून ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. देशाची सुरक्षा, सीमापार दहशतवादाचा मुकाबला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या धोरणात्मक भूमिकेला आकार देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे डॉ. रोहित टिळक यांनी नमूद केले.
Source link
अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर:1 ऑगस्टला पुण्यात अमित शहा यांच्या हस्ते वितरण