Headlines

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठात छायाचित्र प्रदर्शन:निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके, ग्रामस्वच्छतेचा संदेशही दिला




लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाडगे बाबा अध्यासन केंद्र आणि समर्थ गुरुकृपा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या (शिंदे बुद्रुक) संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी भरवण्यात आली. यासोबतच निबंध स्पर्धाही घेण्यात आली, ज्यात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ होते, तर उद्घाटन सुधीर रसे यांच्या हस्ते झाले. गाडगे बाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, राजेंद्र पवार, देवेंद्र पेटकर, देवेंद्र लहाने आणि अरुण सारडे यांची प्रमुख उपस्थिती होती. निबंध स्पर्धेतील विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय, गावातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होऊन परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सतीश तराळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, लोकनाट्य आणि सामाजिक योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. अण्णाभाऊ साठे हे लोकनाट्याचे जनक असून, वेगळ्या आशय-अभिव्यक्तीच्या कथा व कादंबऱ्या लिहिणारे महान जनसारस्वत आणि शैलीकार होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगे बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यावरही प्रकाश टाकला. डॉ. दिलीप काळे यांनी गाडगे बाबा अध्यासन केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केंद्राने गावखेड्यांपर्यंत पोहोचून संत गाडगे बाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केल्याचे त्यांनी सांगितले. गाडगे बाबा विचार साहित्य संमेलन, संत तुकाराम महाराज व संत गाडगे बाबा यांचे तुलनात्मक अध्ययन चर्चासत्र, सरपंच संमेलन, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा सन्मान सोहळा तसेच सफाई कर्मचाऱ्यांना जलशुद्धी यंत्र वितरण यांसारखे अनेक उपक्रम अध्यासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत अपाले यांनी केले, तर आभार मंगेश सांगोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष रोही, आशिष वाठ, उमेश मुळे, तन्मय वाठ, राजश्री सचिन कुरळकर आणि सच्चिदानंद प्रफुल्ल वाठ यांनी परिश्रम घेतले. यावेळी भरत लहाने, सचिन लहाने, कविता पेटकर, आयुष रोही, रामेश्वर इंगोले यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *