![]()
sअधिक मास हा भगवान विष्णूच्या आराधनेचा अतिशय पवित्र काळ मानला जातो. हा मास १५ जूनपर्यंत असून या पवित्र महिन्यात जावई आणि लेकीचा विशेष सन्मान करून त्यांना चांदी, सोन्याचे दागिने किंवा वस्तू भेट देण्याची जुनी परंपरा आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी कौटुंबिक गेट-टुगेदर सोहळे रंगत आहेत. या पारंपरिक सोहळ्यांमध्येच यंदा ग्रामीण भागात आणखी एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे, तो म्हणजे माय-लेकीच्या ओटीभरणाचा. यामध्ये लेक आपल्या आईला साडी भेट देत आहे, तर आईदेखील मुलीला साडी भेट देत दोघीही परस्परांचा सन्मान करताना दिसताहेत. साडी भेट देण्याच्या नव्या ट्रेंडमुळे गावोगावच्या कापड दुकानात महिलांच्या साड्या खरेदीमुळे चांगली आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळी अधिक मासात फक्त जावई विष्णू रूप म्हणून केंद्रस्थानी दिसत असत. यावर्षी मात्र ग्रामीण भागात पुरुषोत्तम मासात ”माय-लेकीच्या बॉन्डिंग”ला धार्मिकतेची अनोखी जोड देऊन भावनिक आणि सकारात्मकतेचा एक नवा ट्रेंड समोर आलेला बघावयास मिळत आहे. फाईव्ह जी, सिक्स जी स्पीडने धावणाऱ्या या संगणकीय काळात नात्यातील नवनवे ट्रेंड सेट होत असून सासरी गेलेल्या मुली या माहेरी फक्त पाहुण्या म्हणून न जाता त्या आपल्या आईच्या कर्तृत्वाचा, नात्याचा आणि तिच्या त्यागाचा सन्मान परस्पर ओटीभरणातून करत आहेत. ज्या लेकींचे वडील स्वर्गवासी झालेत त्या आईस फक्त साडी भेट देत आहेत, तर ज्यांची आई स्वर्गवासी झालीये त्या लेकी आपली मावशी अथवा माहेराकडील आईसमान स्त्री यांस साडी भेट देताहेत. आपल्या आईस भेट देण्यासाठी साडी खरेदी करताना महिला तिच्या पसंतीच्या रंगांची आणि चांगल्या प्रतीच्या साडीस प्राधान्य देत आहेत. अनेक महिला एकसारख्या डिझाइन, एकसारखे रंग किंवा एकाच पॅटर्नमधून साड्या निवडताना दिसतात. खरेदीसाठी महिला गर्दी ^चालू अधिक मासात माय-लेकी एकमेकींना साड्या भेट देऊन ओटी भरण्याच्या नव्या ट्रेंडमुळे सध्या साड्या खरेदीसाठी महिला ग्राहक मोठ्या प्रमाणात येत आहेत. साडी खरेदीसाठी महिलांचा आवडता सण नागपंचमीप्रमाणे या मासात साड्यांची विक्री होतेय. आतापर्यंत ६०० हून अधिक साड्या विक्री झाल्यात. — सुधीर पवार, व्यापारी, पापरी)
Source link
अधिक मासात माय-लेकींच्या ओटीभरणाचा ट्रेंड:लेकींकडून आईचा सन्मान; आहेराच्या साडीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल