![]()
“एक आई म्हणून मला वाटते की, मुलींना केवळ जपणे पुरेसे नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण करणे आणि पालकांनी त्यांना भक्कम पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यायाविरुद्ध मौन बाळगू नका,” असे आवाहन अभिनेत्री दीप्ती केतकर यांनी केले. महिला सुरक्षा आणि त्यांच्यावरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सन मराठी वाहिनीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत सध्या अत्यंत संवेदनशील विषयावर प्रकाश टाकण्यात येत आहे. या संदर्भाने त्यांनी हे आवाहन केले. निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे मंथन झाले असले, तरी आजही अशा घटना घडताना दिसतात. अशा काळात पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे किती गरजेचे आहे, हे या मालिकेद्वारे दाखवण्यात येत आहे. अनुप्रिया थेट लढ्यात उतरते मालिकेतील सध्याच्या कथानकानुसार, पिहू या मुलीचे तिच्या बॅडमिंटन कोच गोयलकडून लैंगिक शोषण होते. या अन्यायाविरुद्ध गप्प न बसता तिची आई अनुप्रिया थेट लढ्यात उतरते. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ती रस्त्यावर उतरून उपोषणही करते. एका आईचा आपल्या पाल्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष प्रेक्षकांना भडकवत असून, आता या प्रकरणी न्यायालय कोणता निकाल देणार याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या संघर्षाचा विशेष महाएपिसोड येत्या शनिवारी, 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 व सायंकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे. मुलींमध्ये धैर्य निर्माण करा या भूमिकेबद्दल आणि सामाजिक परिस्थितीबद्दल बोलताना अभिनेत्री दीप्ती केतकर यांनी भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “अशा घटना ऐकल्यावर मन खूप विषण्ण होते. कलावंत म्हणून हे प्रसंग पडद्यावर साकारतानाही प्रचंड मानसिक त्रास होतो. खऱ्या आयुष्यात या प्रसंगांना सामोरे जाणाऱ्या मुली आणि त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल, याची कल्पनाही करवत नाही. एक आई म्हणून मला वाटते की, मुलींना केवळ जपणे पुरेसे नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण करणे आणि पालकांनी त्यांना भक्कम पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे. अनुप्रियाच्या भूमिकेतून मी हाच संदेश देऊ इच्छिते की, अन्यायाविरुद्ध मौन बाळगू नका.” ही मालिका केवळ एका पात्राचा लढा नसून समाजातील गंभीर वास्तवावर बोट ठेवणारी ठरत आहे. पीडित मुलींना न्याय आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही काळाची गरज आहे, हा मोलाचा संदेश या कथानकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
Source link
अन्यायाविरुद्ध मौन बाळगू नका!:अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली – मुलींना केवळ जपणे पुरसे नाही, त्यांच्यात आवाज उठवण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण करा!