Headlines

अभिनय, सादरीकरण, रंगभूषा, व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन:नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप; मान्यवरांचा विशेष सहभाग‎




पत्रकार कॉलनी नवयुवक क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्था संचालित सिद्धी गणेश प्रॉडक्शनचा वतीने गत १३ वर्षांपासून अकोल्यात आयोजित करण्यात येणाऱ्या निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यंदाचे शिबिर सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिरात १४ वर्षांवरील विद्यार्थी सहभागी होते. शिबिरात सिने व नाट्य सृष्टीतील अनुभवी कलावंतांनी विद्यार्थ्यांना अभिनय, रंगमंचीय सादरीकरण, रंगभूषा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन केले. मुंबई येथील अभिनेते सागर लांडगे, सुप्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक डॉ. सुनील गजरे, दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) प्रशिक्षित दिग्दर्शक व नाट्य प्रशिक्षक पुष्पक भट, ज्येष्ठ एकपात्री कार दिलीप देशपांडे तसेच दिग्दर्शक, अभिनेते व लेखक विष्णू निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. रंगभूषाकार प्रवीण इंगळे यांनी रंगभूषेची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. शिबिराचे उद्घाटन २५ मे रोजी ज्येष्ठ नाट्यकर्मी व एकपात्री कार दिलीप देशपांडे आणि अभिनेते सागर लांडगे यांच्या हस्ते झाले. तर ३१ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.शिबिरार्थी श्रावणी जैन हिने कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी समारोप समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे, जनरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अभियंता अभिजीत परांजपे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संचालक सचिन गिरी यांनी उपस्थित मान्यवर, पालकवर्ग आणि रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. अकोल्यातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिद्धी गणेश प्रॉडक्शन सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाट्य कलेविषयी आवड निर्माण झाली असून भविष्यात व्यावसायिक रंगभूमी व चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. विविध नाट्यछटांनी वेधले सर्वांचे लक्ष समारोप कार्यक्रमात शिबिरार्थ्यांनी विविध नाट्यछटा, प्रहसने, एकपात्री प्रयोग आणि नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये ‘शुभमंगल सावधान’, ‘एक मैत्री अशीही’, ‘आम्ही दोघेच पुरे आहोत’, ‘वाढदिवस’, ‘आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन’, ‘निचे पान की दुकान उपर जुली का मकान’, ‘हिरकणी’ या एकपात्री प्रयोगासह ‘हे चंद्रछुडा’ यांसारख्या सादरीकरणाचा समावेश होता. प्रमाणपत्र देऊन गौरव शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू क्षीरसागर, आर्यन सदाशिव, भावना भोपळे, अश्विनी ठाकरे, अक्षय पिंपळकर, मंदार घेवारे, रोशन समदूरे, प्रमोद वानखडे, नचिकेत वजीरे, स्वराज पातोडे आणि महेश इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शिबिरार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *