Headlines

अमरावतीत सरासरीपेक्षा 66.2 टक्के कमी पाऊस:15 दिवसांपासून दडी, 202.30 मिमी.ची तूट; शेतकरी चिंतेत




अमरावती जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अवर्षणाचे सावट गडद झाले आहे. १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५९८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ३९५.७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे २०२.३० मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली असून, ही सरासरीच्या ६६.२ टक्के आहे. पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या मुख्य पिकांची वाढ खुंटली आहे. ऐन वाढीच्या काळातच पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा संपला असून, पिके पिवळी पडू लागली आहेत. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही खालावल्याने शेतकऱ्यांसमोर पिके वाचवण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या होत्या. मात्र, आता कडक ऊन आणि वाढलेल्या उष्णतेमुळे पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. या पावसाच्या अनिश्चिततेचा फटका केवळ शेतीलाच नव्हे, तर ग्रामीण आणि शहरी भागातील अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. शेतीवर आधारित असलेल्या जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खते, कीटकनाशके आणि शेती उपकरणांची मागणी अचानक थांबली आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रांचे व्यवहारही ठप्प झाले आहेत. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या मते, अमरावती जिल्ह्यासह विदर्भात सध्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांचे अतोनात नुकसान होऊ शकते. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये अचलपूर, चिखलदरा आणि वरुडचा समावेश आहे. अचलपूर तालुक्यात सरासरी ५६८.५ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना, केवळ २९२.३ मिलीमीटर (५१.४ टक्के) पाऊस नोंदवला गेला आहे. चिखलदरा तालुक्यात ९४९.८ मिलीमीटरऐवजी ५२२.९ मिलीमीटर (५५.१ टक्के) तर वरुड तालुक्यात ५५२.५ मिलीमीटरऐवजी ३१७.१ मिलीमीटर (५७.४ टक्के) पाऊस झाला आहे. उत्पन्नाची अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावली आहे. यामुळे कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि दैनंदिन वस्तूंच्या विक्रीतही घट झाली आहे. एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानदाराच्या मते, गेल्या पंधरवड्यात विक्री सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या प्रदीर्घ दांडीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे आर्थिक गणित कोलमडले असून, आता सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *