![]()
चांदूर रेल्वे येथील धीरज संतोष कालावटे या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय अनेकांसाठी जीवनदान देणारा ठरला आहे. रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या धीरजचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे काही अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अमरावतीच्या रेडियंट हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या समाजाभिमुख निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी धीरज आपल्या पाच मित्रांसह केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेला गेला होता. परत येत असताना तळेगावजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात धीरजचा मित्र ललित युवराज सवाने (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला. धीरजच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने अमरावती येथील रेडियंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी धीरजची मृत्युशी झुंज संपली. धीरज हा अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असे. स्वभावाने तो अतिशय सरळ आणि मनमिळाऊ असल्याने त्याचे सर्वांशी चांगले संबंध होते. धीरजच्या अकाली निधनाने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धीरजच्या परिवारात आई-वडील, एक लहान बहीण आणि दोन काका असा मोठा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराने धीरजच्या निधनानंतर आपले दुःख बाजूला सारून त्याच्या अवयवदानाचा आदर्श निर्णय घेतला. त्यानंतर नागपूरहून आलेल्या डॉक्टरांच्या एका चमूने अमरावतीत अवयवदानाच्या प्रक्रियेला पूर्ण केले. कालावटे कुटुंबीयांच्या या धाडसी आणि आदर्श निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत आणि कौतुक केले जात आहे.
Source link
धीरजच्या अवयवदानाने अनेकांना जीवनदान:अपघातात निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा धाडसी निर्णय